सिंधुदूर्ग जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा दशक्रोषितील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी नदी, ओहोळ यांचे पाणी पात्र ओलांडून शेतात घुसले अन शेत जमिनीला नदीचे स्वरूप आले आहे. दरम्यान सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती.
बांदा दशक्रोशिसह सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.बांदा नीमजगा येथे मोठ्याप्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे तसेच बांदा वाफोली पाटकर बागेजवळ पुलावरून पाणी जात असल्याने आज आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांची घरी जाण्यासाठी तारांबळ उडाली होती. शेर्ले कापई पूल पाण्याखाली गेले होते. तर मडुरा सातोसे मार्गावरील मडुरा माऊली मंदिर पुलावर पाणी आल्याने पंचक्रोशीतील चार गावांचा संपर्क तुटला. पाडलोस माडाचेगावळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाडीचा गावाशी संपर्क तुटला होता.
बांदा शिरोडा मार्गावरील न्हावेली रेवटेवाडी पुलावर पाणी आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मडुरा हनुमान मंदिर जवळील पुलही पाण्याखाली गेले होते. मडुरा-पाडलोस सीमेवर सुरू असलेल्या कालव्याचा भरावही कोसळला. दांडेलीतील पुलावर पाणी आल्याने आरोस-दांडेली-न्हावेली मार्गे सावंतवाडी मार्ग वाहतुकीस काही काळ बंद झाला. ठिकठिकाणची केलेली भात पेरणी पाण्याखाली जाऊन कुजण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. धो धो कोसळणार्या पावसामुळे सर्व रस्त्यावर वाहनांची वर्दळ मात्र कमी होती.