You are currently viewing सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांचा यशस्वी तपास.

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांचा यशस्वी तपास.

सावंतवाडी शहरातून गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या अपहरण झालेल्या मुलीचा अखेर शोध लावण्यात सावंतवाडीतील मुस्कान ऑपरेशन टीम ला यश आले आहे. मुस्कान ऑपरेशन टीमच्या अधिकारी तथा तपासी अधिकारी स्वाती यादव-बाबर यांनी मुलीचा शोध लावण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आणि सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी महिला तपासी अधिकारी स्वाती यादव आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात अज्ञाताकडून अपहरण झालेल्या मुलीच्या प्रकरणात कर्नाटक खानापूर येथील एका २७ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो युवक सावंतवाडीत भाड्याने राहत होता, त्यावेळी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली. या ओळखीतून त्याने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचे तपासात उघड झाले होते. तपासी अधिकारी स्वाती यादव यांनी याप्रकरणी तपास केला असता गुन्हा दाखल असलेल्या युवकाचे मोबाईल लोकेशन कर्नाटक खानापूर येथे मिळाले होते. पोलिस पथकाने दोन तीन वेळा तिथे जाऊन शोध घेतला होता, परंतु युवक गुंगारा देत होता व मुलगी देखील सापडत नव्हती.

अखेर दहा महिन्यानंतर मुलगी त्या युवकाच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहा.पो. निरीक्षक स्वाती यादव, हवालदार सुनील भोगण, चालक सिक्वेरा यांनी खानापूर येथील जंगलमय भागात ठाण मांडला. चार किलोमीटर जंगलातून व पुढे पाणथळ भागातून वाट काढत शेवटी युवकाचे घर गाठले. युवकाच्या घरी मुलगी भेटली, परंतु तो युवक फरार होता. मुलीला ताब्यात घेत पोलीसांनी सावंतवाडी गाठले. मुलीला पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती मिळताच युवक शनिवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोचला. युवक आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांना देखील पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. सध्या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असले तरी गुन्हा दाखल झाला तेव्हा मुलगी सतरा वर्षांची असल्याने त्या युवकावर मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तब्बल १० महिने गुन्हेगार गुंगारा देत असताना देखील माहिती मिळताच गुन्हेगाराचा शोध घेत गुन्ह्याचा यशस्वी तपास करणाऱ्या सहा.पो.निरीक्षक स्वाती यादव यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा