वैभववाडी
कोरोनारुपी जागतिक महामारीने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे. या महामारीला न घाबरता त्यापासून आपला बचाव करण्यासाठी प्रत्येकाने एस.एम.एस. (SMS) या त्रिसूत्रीचा वापर केला पाहिजे,असे डॉ.राजेंद्र पाताडे यांनी सांगितले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण- विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती आणि प्रबोधनाच्यादृष्टीने आयोजित केलेल्या ‘कोरोना : वास्तव आणि अवास्तव’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात केले.
‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ ही संस्था ग्राहक केंद्रबिंदू मानून ग्राहकाचे संघटन, प्रबोधन व कायदेशीर मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. परंतु सध्या कोरोना महामारीने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यादृष्टीने प्रबोधनात्मक ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू करुन पहिले व्याख्यान ‘कोरोना: वास्तव आणि वास्तव’ या विषयावर आयोजित केले होते. यावेळी डॉ.पाताडे यांनी एस.एम.एस. म्हणजे सोशल (फिजिकल) डिस्टन्सिंग, मास्कचा योग्य वापर आणि सॅनिटायझेशनचा वापर या त्रिसूत्रीचा वापर केल्यास कोरोना महामारी पासून बचाव होण्यास मदत होते असे सांगितले. यावेळी त्यांनी कोरोना महामारीचा इतिहास, त्याची वाटचाल, भारतातील सद्यस्थिती, त्याची वेगवेगळी लक्षणे, त्यावरील उपाय व घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कोरोना महामारीच्या काळात ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने एका महत्त्वाच्या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करून खऱ्या अर्थाने प्रबोधन केले आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
या ऑनलाईन कार्यक्रमाला राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक बहुसंख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी केले.