वाढदिवस म्हटला की आनंदाला उधाण येतं. लहानांपासून थोरा मोठ्यांच्या शुभेच्छा मिळणे हे देखील भाग्यच समजलं जातं. असाच एक वाढदिवस म्हणजे बांधकाम क्षेत्रात चिरे बांधकाम मध्ये विशेष कौशल्य दाखवून उल्लेखनीय काम केलेल्या सावंतवाडीच्या श्री परशुराम पटेकर यांचा. १२ जून रोजी वयाच्या ७६ व्या वर्षात पदार्पण केलेल्या परशुराम पटेकर यांनी वयाच्या तेराव्या वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कामाला सुरुवात केली होती. त्यावेळचे रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव मोठे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे श्री. देशपांडे यांच्या समवेत रत्नागिरी आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरीच सरकारी ऑफिस, एस टी डेपो इत्यादी मोठमोठी बांधकामे करत गाठीशी दांडगा अनुभव घेत त्यांनी स्वतः ठेका घेण्यास सुरुवात केली ते मागे वळून कधी पाहिलंच नाही.
८० च्या दशकात कामे जास्त नसल्याने सातार्डे परिसरातील २०/३० कामगार त्यांच्याकडे कामाला असायचे. स्वतः ठेकेदारी करत असताना त्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या कितीतरी कामगारांची लग्न स्वतःच्या खर्चातून केली. काहींची घरकुले उभी करून दिली. आजही अनेक लोक त्याची आठवण काढतात. लोकांचे आशीर्वाद हीच शिदोरी मानत ते जीवन जगले. आपल्या मुलांना देखील उच्चशिक्षण दिले, त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत महेंद्र , दीपक हे देखील बांधकाम क्षेत्रात उतरले.
सावंतवाडीत झालेली शिल्पग्राम, हेल्थफार्म, भोसले उद्यान येथील कलाकुसरीची चिरे बांधकामे देखील त्यांनी केली.. दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना चिरे बांधकाम म्हटल्यावर पहिले नाव घ्यायचे ते परशुराम पटेकर यांचेच. एवढा चिऱ्याच्या कामात त्यांचा हातखंडा आहे. अनेक लोक बांधकाम क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. देवगड तालुक्यातील ७० च्या काळात बेघर झालेल्या अनेक लोकांना त्यांनी एकही पैसा न घेता घरे बांधून दिल्याची आठवण ते आजही सांगतात. आपल्या अनुभवाच्या जोरावर आजपर्यंत कितीतरी कॉन्ट्रॅक्टर आणि कारागीर त्यांनी घडविले आहे, जे आजही बांधकाम क्षेत्रात जिल्ह्यात कार्यरत आहेत. अकुशल कामगारांना कुशल बनवून आपल्या पायावर उभे राहण्यास ते कायम सहकार्य करत राहिले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गाव, शहरांमध्ये काम करणारे परशुराम पटेकर आजही वयाची ७६ वर्षे होऊनही सावंतवाडीत सुरू असणाऱ्या आपल्या मुलांच्या बिल्डिंगच्या कामांवर जातीने लक्ष देऊन असतात, त्यामुळेच त्यांची बांधकामे उत्कृष्ट दर्जाची गणली जातात. बांधकाम क्षेत्रात पूर्ण हयात घालवत एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाव कमावलेल्या श्री. परशुराम पटेकर यांचा १२ जून हा वाढदिवस, त्याच बरोबर त्यांची सुविद्य पत्नी सौ. मोहिनी यांचा ८ जून रोजी वाढदिवस. श्री. परशुराम पटेकर उभयतांस संवाद मिडियाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…