येत्या १५ जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर मत्स्यगंधा एक्स्प्रेस पुन्हा सुरू होणार आहे. कोरोनाच्या काळात अनेक रेल्वे गाड्या बंद झाल्या. त्यामध्ये ०२६१९ /०२६२० क्रमांकाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगलोर सेंट्रल या मार्गावर धावणाऱ्या या गाडीचा समावेश होता. कोरोनाच्या काळात ही गाडी सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल या नावाने धावत आहे.
गेल्या काही काळापासून बंद असलेली ही गाडी येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. मंगलोर ते एलटीटी मार्गावरील ०२६१९ क्रमांकाची गाडी मंगलोर येथून येत्या १५ जून ते ३० जून या कालावधीत दररोज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या मार्गावर ०२६२० ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६ जून ते एक जुलै या काळात दररोज दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मंगलोर येथे पोहोचेल. या गाड्यांना बावीस डबे असतील. गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. एलटीटी-मंगलोर मार्गावरील गाडीला माणगाव आणि खेड हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन अधिक थांबे देण्यात आले आहेत.