कुडाळ :
शिवसेनेची स्थापना ही मुळातच गुंडगिरीच्या भाषेवर झाली असताना माझ्या विधानाला गुंडगिरीची भाषा सांगून सहानुभूती मिळविण्याचा तसेच पक्षातील आपल्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न नागेंद्र परब यांनी करू नये, असा टोला जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते रणजित देसाई यांनी शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांना लगावला. देसाई म्हणाले, नागेंद्र परब हे शिवसेमेत नव्याने सक्रीय झालेले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री, दोन्ही आमदार व पदाधिकारी हे बाळासाहेबांचे सैनिक नसून ते नवसैनिक आहेत. शिवसेनेची स्थापना ही मुळातच गुंडगिरीच्या भाषेवर झाली. त्यामुळे परब यांनी विचार करून बोलावे देसाई पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांना जर संवेदनिक भाषा समजत नसेल तर त्यांना वेगळ्या भाषेत दम द्यावा लागतो, तेच आपण केले.
माझ्या या संवेदनिक भाषेत जर पालकमंत्री किंवा अन्य अधिकाऱ्यांना गुंडगिरीची भाषा जाणवत असेल. तर त्यांनी खुशाल माझ्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता. पण तसे न होता केवळ दोन तासातच ऑनलाईन त्या सर्व रुग्णवाहिकांच लोकापर्ण कराव लागल, यातच माझ्या विधानचा यश लपल आहे. त्यामुळे कदाचित नागेंद्र परब घाबरलेले आहेत. पक्षातील आपलं स्थान कुठेतरी कमकुवत होणार अस त्यांना वाटत असेल म्हणून ते बिथरले आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या या रुग्णवाहिका यात कुठलेही राजकारण करण्याची गरज नाही. या रुग्णवाहिका या जिल्हा खनिकर्म विभागातूनच मिळालेल्या आहेत. मात्र या रुग्णवाहोकांच लोकार्पण आपल्याच हस्ते झाले पाहिजे या पालकमंत्र्यांच्या हट्टापायी मिळालेल्या या रुग्णवाहिका चार चार दिवस जिल्हा परिषदेच्या आवारात भिजत होत्या. त्यामुळे माझ्या विधानाचा वेगळा अर्थ काढून सहानुभूती मिळविण्याचा तसेच पक्षातील आपल्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न नागेंद्र परब यांनी करू नये.