कुडाळचा ऑक्सिजन प्लँट हे तर साधे रिफिलिंग युनिट! मग खाजगी उद्योगासाठी शासकीय पायघड्या आणि नियमांची राजरोस पायमल्ली कशाकरता?
“लक्षवेधी आंदोलना”त आणखीही फुटणार बाँब!भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांची पोलखोल सुरूच!!
आरोग्याच्या प्रश्नावर कोणी बोलायला गेले की “ही राजकारणाची वेळ नाही” हे उत्तर देत त्याच्या तोंडावर तत्ववादाची पट्टी मारण्याचा प्रयोग या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुखेनैव चालला होता. पण कधी ना कधी वेळ बदलते, हे सत्ताधारी विसरले. ती वेळ राजकारण करण्याची नव्हती, तर कसली होती, हे आता हळूहळू जनतेला समजू लागले आहे. अँबुलन्समधली लूट, कोविड सेंटर मधली अवास्तव बिले, एवढेच नव्हे तर प्रेतांच्या अंत्यविधीच्या खर्चातले घोटाळे… यासाठीची ती वेळ होती का? पालकमंत्री उदय सामंत यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. पालकमंत्री या शब्दाला जागण्यासाठी किती कालावधी घेणार हे देखील त्यांनी सांगावे. चोराच्या हातात जमादारखान्याच्या किल्ल्या असा दुर्दैवी प्रकार या जिल्ह्याच्या नशिबी आलाय. कोणी कोणावर विश्वास ठेवायचा? सगळ्या घोटाळ्याचे कनेक्शन जिथे थेट सत्ताकेंद्राकडे जाताना जनतेला दिसते आहे, तिथे कोणत्या न्यायाची अपेक्षा जनतेने तुमच्याकडून करावी, असे रोखठोक सवाल पालकमंत्री उदय सामंत यांना करत भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक अविनाश पराडकर यांनी प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली आहे.
किस्सा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एमआयडीसी मधला!आठच दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून “ऑक्सीजन प्लांट’चे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महामहीम उद्धवजी ठाकरे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी खरं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला असे भासवण्यात आले की पंधरा दिवसाच्या विक्रमी वेळेत ऑक्सीजन निर्मितीचा प्लांट उभा करण्यात आला. केवळ जिल्ह्यातील लोकांनाच नव्हे तर कदाचित मुख्यमंत्री महोदयांना देखील हेच भासवून त्यांच्यामार्फत या प्लांटचे उद्घाटन करण्यात आले असावे. मात्र वस्तुस्थिती पाहता उद्घाटन झालेला ऑक्सीजन प्लांट हा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट नसून केवळ सिलेंडर मध्ये ऑक्सीजन रिफिलिंग करण्याचा प्लांट आहे हे आता कुठे जनतेला कळून चुकलं आहे.
या अगोदरदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्याला अन्य भागात निर्मिती झालेल्या ऑक्सिजन प्लांट मधूनच तर ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. मग गाजावाजा केलेल्या प्लॅन्टमध्ये काय नवे कौतुक होते? पूर्वीच्या प्रक्रियेमध्ये आणि नवीन प्लॅन्टच्या प्रयोगातून वेगळे काय घडले हे तरी प्रशासनाने स्पष्ट करावे. एवढा गाजावाजा करावे असे यात काहीही विशेष नव्हते. केवळ जे ऑक्सीजन सिलेंडर इतर जिल्ह्यातून भरून येत होते त्याऐवजी अख्खा टँकर इथे येणार आणि फक्त ऑक्सीजन सिलेंडर काय ते आता आपल्या जिल्ह्यात भरले जाणार. सरळ आणि थेट सांगायचे झाले तर या अगोदर ऑक्सिजन हा सिलेंडर मध्ये भरून येत होता तो आता ऑक्सिजन टँकरमध्ये भरून येणार. म्हणजेच पेट्रोल पंपावर टँकरद्वारे पेट्रोल येते आणि वाहनांमध्ये ते भरले जाते त्यापेक्षा किंचितही वेगळा प्रकार नाही.
माननीय मुख्यमंत्री महोदय यांनीदेखील या असल्या किरकोळ ऑक्सीजन रिफिल प्लॅन्टच्या उद्घाटनला वेळ कशी दिली आणि पालक मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे कौतुक कशासाठी केले, हे एक भलेमोठे प्रश्नचिन्ह आता पडले आहे. स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याच्या अखंड शृंखलेतला हा आणखीन एक प्रकार आता जनतेच्या समोर आलेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी देखील ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार होते व त्या ऑक्सीजन प्लांट मधून ऑक्सिजनची निर्मिती होणार होती. त्याची फक्त चर्चाच झाली, पुढे काहीही नाही. कारण तसे झाले तर त्यामध्ये खाजगी ऑक्सिजन वितरकांचा कोणताही फायदा नाही हे लक्षात आल्यामुळे अशाप्रकारचा फायदा मिळवून देणारा हा खाजगी तत्त्वावरचा ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट घालण्याचा घाट घालण्यात आला. सदर ऑक्सीजन प्लांटच्या भागीदार महोदयांनी सदर उद्घाटनावेळी दिलेली प्रतिक्रिया देखील बोलकी आहे. ते स्वतः म्हणाले आहेत की रत्नागिरी येथील किरण सामंत यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. आता हेच किरण सामंत खासदार पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. त्यामुळे अनेकवेळांप्रमाणे पुन्हा एकदा या ऑक्सीजन प्लांट मागे असलेले “रत्नागिरी कनेक्शन’ उघड झालेले आहे. यावेळी बोलतांना त्यांनी असे देखील कबूल केले की सदर ऑक्सीजन प्लांटची जागा ही एका मोठ्या खड्ड्यात होती. त्या खड्ड्यांमध्ये कित्येक ट्रीप मातीचा भराव करण्यात आला!!
आता प्रश्न निर्माण होतोय की भल्या मोठ्या खड्ड्यात टाकण्यासाठी ही माती कुठून आणण्यात आली? त्याकरता उत्खननासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? माती उत्खननाची रॉयल्टी भरण्यात आली होती का?… अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहतात. एमआयडीसी मधील काही स्थानिक कारखानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर माती ही एमआयडीसी मधील एका उद्योजकाच्या प्लॉटमधून त्याला न विचारताच काढण्यात आली आणि जेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला तेव्हा एमआयडीसीतील काही अधिकाऱ्यांनी शासकीय दडपणाखाली हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न देखील केला.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुडाळ येथील येथील कोकण गॅसेस या कंपनीचे प्रतिनिधी कुडाळकर यांना घेऊन आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली होती व ऑक्सिजन प्लांट करिता एमआयडीसीमध्ये भूखंडाची मागणी केली होती. कोकण गॅसेस हा कारखाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना व विविध हॉस्पिटल्सना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा गेली अनेक वर्षे करत आहे. श्री.कुडाळकर यांनी भूखंड मिळाल्यास त्यामध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट किंवा ऑक्सीजन रिफिलिंग प्लांट उभारण्याची तयारी देखील दर्शवली होती. मात्र अचानक रत्नागिरीहून काही सूत्र हलली व कुडाळकर यांना देण्यात आलेले ऑफर लेटर रद्द करण्यात आले व त्या जागी केवळ आणि केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून नवीन व्यावसायिकांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरता भूखंड देण्यात आला.
सर्वात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या खाजगी तत्त्वावरील ऑक्सीजन प्लांट उभारणी करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच उच्चपदस्थ अधिकारी दिवस-रात्र मेहनत घेत होते. एक दिवस आड करत सदर कामाच्या साईट वरती सर्व सर्वच अधिकारी व्हिजिट देत होते. या ऑक्सीजन प्लांटच्या संचालकांना रेड कार्पेट अंथरण्यात आलेले होते. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून चालले होते?
स्वतःची पाठ थोपटून घेतलेल्या बहुचर्चित ऑक्सिजन प्लँटमधून बनवाबनवी सोडून दुसरं कसलंच मॅन्युफॅक्चरिंग होत नाहीय हे जनतेसमोर आलेच आहे! सत्ताधारी पक्षाने आपल्या दमदार कामगिरीचे आता “करून दाखवले” ऐवजी “बनवून दाखवले” नावाने प्रगतीपुस्तक तरी प्रामाणिकपणे काढावे, यापेक्षा आणखी कोणता सल्ला यांना द्यावा, असा संतप्त सवाल अविनाश पराडकर यांनी केला आहे.