सिंधुदुर्गनगरी
जिल्हा खनिकर्म निधीमधून प्राप्त झालेल्या सहा रुग्णवाहिकांचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. जिल्हा खनिकर्म निधीमधून जिल्ह्यात एकूण 12 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 6 रुग्णवाहिका या पूर्वीच प्राप्त झाल्या असून रुग्णांच्या सेवत त्या दाखल झाल्या आहेत. आज आणखी 6 रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे ऑनलाईन सहभागी झाले होते. तर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.
सुरुवातील जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रुग्णवाहिकांची पूजा करण्यात आली.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका मिळाल्या याचे समाधान आहे. पण, सध्या असलेल्या जुन्या रुग्णवाहिकाही कार्यान्वीत ठेवण्यात याव्यात. त्यातील काही रुग्णवाहिकांचा वापर शववाहिका म्हणून करावा.
आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्हा खनिकर्मचा निधी जिल्ह्यात खर्चास परवानगी दिल्याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. या निर्णयामुळेच जिल्ह्याला आज इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.
आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी प्रस्तावना व स्वागत केले.