पावशी :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावशी गावात बुधवारी ९ ते सोमवार १४ जून या कालावधीत ६ दिवसाकरिता कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. गावात ग्राम विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून १० पुरुष व ६ महिला अशा प्रकारे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती पावशीचे सरपंच भिकाजी ऊर्फ बाळा कोरगावकर यांनी दिली.
पावशी ग्रामपंचायत येथे ग्राम नियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गाव कोरोना मुक्त करण्यासाठी विविध उपाय योजना व जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बुधवार ९ ते सोमवार १४ जून पर्यंत गावात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दुकाने, हॉटेल, कारखाने, मंगल कार्यालय, खाजगी संस्था व इतर कार्यालये बंद राहणार आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त गावातून बाहेर जाणे किंवा बाहेरील व्यक्ती गावात येण्यास सक्त मनाई आहे. लॉकडाऊन काळात फिरणाऱ्या व्यक्तींकडे खाजगी अथवा शासकीय कार्यालयाचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती विनामास्क किंवा विनाकारण फिरताना आढळल्यास करून २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भाजी व मच्छी विक्रेते फिरताना आढळल्यास त्यांच्यावर ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहेत. धार्मिक सण व कार्यक्रम घरापुरते मर्यादित साजरे करावेत. छुप्या पद्धतीने व्यवसाय सुरु आढळल्यास २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या प्रकारचे निर्णय घेण्यात आले असून व्यावसायिक व नागरिकांनी याला लॉकडाऊन ला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच कोरगावकर यांनी केले आहे.