संपादकीय…..
कोरोनाची भयानकता ज्यांना समजली त्यांनी कोरोनाची धास्तीच घेतली आहे. कोरोनाच्या भीतीने गावागावातील ग्रामस्थ जागृत झाले आहेत. अनेक घरातील तरुण, युवक तर कित्येक वयस्कर कर्तीसवर्ती माणसे जग सोडून गेली आहेत. अनेक नाती एकमेकांपासून दुरावली आहेत. आपल्या घरातील आपलीच माणसे जग सोडून गेल्यावर त्यांचे अंतिम संस्कार देखील घरातील माणसांना करता येत नाहीत. जिवंत असेपर्यंत एकमेकांना जीव लावणारे आपलेच लोक मृत्यूनंतर आपल्याला परके झालेले आहेत.
असाच एक दुर्दैवी प्रकार मालवण तालुक्यातील चिंदर गावात घडला. चिंदर गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाने त्याचा मृत्यू पक्षाघाताने म्हणजे नैसर्गिक झाल्याचे तपासणीनंतर जाहीर केले. परंतु कोरोनाचा प्रभाव गावात त्या भागात असल्याने त्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी माणसे कमी पडत होती. सदर घटनेची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे यांना मिळताच त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी रणजित दत्तदास याला सोबत घेऊन पीपीई किट परिधान करून अंतिम संस्कार पूर्ण केले.
गावात यापूर्वी कोणीही मयत झाल्यास न सांगताच गाववाले सर्व तयारी करत होते, परंतु कोरोनाच्या भीतीपोटी आज लोक दुरावलीत आणि माणुसकी हरवल्याचे चित्र समाजात दिसत आहे. अशा कठीण परिस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे यांनी पुढे येत मयत व्यक्तीच्या तिरडीला खांदा देत अंतिम संस्कार करून राजकारणा पलीकडे जात आपल्या कृतीने सामाजिक बांधिलकी जपत खरा जनसेवक कसा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण सर्वांसमोर उभे केले.