सातरल गाव झाला पोरका..
कणकवली :
कणकवली तालुक्यातील सातरल गावचे माजी सरपंच नयन राणे (वय ४२) यांचे कोल्हापुर येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. सातरल-कासरल विभागाचे भाजपाचे ते विद्यमान अध्यक्ष होते. सातरल गावचे माजी उपसरपंच तसेच सातरल – कासरल विभागाचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नयन राणे यांचे कोल्हापूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या अशा अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
सातरल गावातील राजकिय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. गेल्या २० वर्षात त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी गावामध्ये रस्ता, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्याच्या सुख सुविधांसाठी खुप मोठे योगदान देऊन आपले गाव समृद्ध बनविण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. गावातील गोरगरीब लोकांसाठी नयन राणे यांचा खूप मोठा आधार होता. कोणाच्याही वेळप्रसंगी मदत करणारा हक्काचा माणूस आपल्याला सोडून गेल्याने सातरल गावच जणू पोरका झाला आहे, अशा प्रकारे गावातील लोकांच्या भावना उमटत आहेत. त्यांच्या मनमिळावू व हसऱ्या स्वभावामुळे राजकीय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा ते सर्वांशी प्रेमाने वागत. त्यामुळे राजकीय विरोधकही त्यांना आपलेसे मानत आणि त्यांनीही सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवले होते.
नयन राणे यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या आईचेही पाच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे आता राणे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. नयन राणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.