आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी लोकांच्या रांगा आहेत पण लस नाही. तसेच काही ठिकाणी लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु लोकांनीच त्याकडे पाठ फिरवली आहे. ज्या ठिकाणी लोक लस घेण्यास अनुत्सुक आहेत. तिथे देशात आणि परदेशातही विविध आकर्षक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. चेन्नईमध्ये एका गावातही असाच उपक्रम राबवला जात आहे जेणेकरून लोकं लस घेण्यास सहकार्य करतील. चेन्नईत मच्छीमारांच्या या गावात लसीकरणाला उत्तेजन देण्यासाठी लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत बिर्याणी दिली जाणार आहे. या योजनेमुळे लसीकरणाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.
विशेष म्हणजे गावात लस घेणाऱ्या प्रत्येकाला लकी ड्रॉ योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. ही योजना एका सेवाभावी संस्थेने सुरु केलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या फाउंडेशनचे अधिकारी असणाऱ्या सुंदर यांनी गावकऱ्यांकडून योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये गावातील केवळ ५४ जणांनी लस घेतली होती. त्यामुळेच आम्ही पुढाकार घेऊन फाउंडेशनच्या वतीने लसीकरण मोहीमेला अधिक प्रतिसाद मिळावा म्हणून काय करता येईल आणि लोकांच्या मनातील लसीकरणासंदर्भातील भीती कशी घालवता येईल यासंदर्भात काम करण्यास सुरुवात केल्याचं, सुंदर यांनी सोशल मिडियाशी बोलताना सांगितलं.