वैभववाडी.
कोरोनावरील उपचार पद्धतीबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. इंजेक्शन रेमडेसीवीर रुग्णांच्या आग्रहाखातर केलेला अतिरिक्त वापर आता गंभीर रुपाने प्रकट होतो आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. भारतीय वैद्यक परिषदेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे औषध उपचार होणे गरजेचे आहे. रुग्णांची भयग्रस्तता, नातेवाईकांची मानसिकता आणि डॉक्टरांची समयसूचकता यांचा मेळ घालणे गरजेचे आहे, असे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी व्यक्त केले. अशा परिस्थितीत अनेकदा औषधांचा अतिरिक्त वापर होण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मार्गदर्शन प्रणालीप्रमाणे आणि आचारसंहितेचे पालन करावे. तसेच रुग्ण आणि डॉक्टरांची उपचारादरम्यान परस्पर सहमती असेल तरच या कोरोना महामारीवर एकोप्याने यशस्वी मुकाबला करणे शक्य होईल या डॉ.विजय लाड यांच्या मताला डॉ.जावडेकर, डॉ.अविनाश भोंडवे यांनी दुजोरा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोरोनावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्संनी भारतीय वैद्यक परिषदेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे औषध उपचार करावेत असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव, अरुण वाघमारे, संघटक श्री.सर्जेराव जाधव, कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी आवाहन केले आहे.