You are currently viewing हे काय चाललंय सावंतवाडीत?

हे काय चाललंय सावंतवाडीत?

विशेष संपादकीय…..

श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या पुण्याईने पावन झालेल्या सावंतवाडीत गेली अनेकवर्षं सुसंस्कृतपणा आणि शांतता एकत्र नांदत होती. शहरातील राजकीय लोक देखील शांत सुसंस्कृत सावंतवाडीची शान होती. राजकीय राडे, सामाजिक राडे हे सावंतवाडीला कधी ज्ञात नव्हते आणि युवकांमध्ये देखील दारू, सिगारेट, चरस, गांजा असे नशेचे प्रकार आले नव्हते त्यामुळे तरुणाई कधी नशेच्या आहारी वाहवत गेली नव्हती. मुलांच्या गॅंग तेव्हाही होत्या परंतु सामाजिक अशांतता पसरेल असं वर्तन कधीही घडत नव्हतं, किंबहुना मुलांच्या गॅंग ह्या एकमेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या माणुसकी जपणाऱ्या होत्या. दीपक केसरकर, आनारोजीन लोबो, श्वेता शिरोडकर, पल्लवी केसरकर, बबन साळगावकर असे गेल्या २५ वर्षात अनेक प्रथम नागरिक शहराने पाहिले. भिन्न स्वभाव, भिन्न जातीधर्म होते परंतु सर्वांमध्ये एकच विचारधारा होती ती शहराची उन्नती सुधारणा आणि मुख्य म्हणजे शहरात शांतता, सामाजिक सलोखा राखणे. मग हीच संस्कृती, प्रवृत्ती अचानक सावंतवाडीत का बदलली आणि तिला खतपाणी कोण घालतं आहे?
बबन साळगावकर यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी शहराच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि डिसेंबर २०१९ ला शहरात सत्ताबदल झाला. शहरात सुधारणा करणार, बदल घडवणार, अमुक आणणार तमुक आणणार अशी वल्गना करत भाजपा सत्तेत आली, संजू परब हे तरुण नेते नगराध्यक्षपदी आले आणि सांगितल्याप्रमाणे शहरात बदल घडला. शहरात शहराच्या हिताचे बदल दिसलेच नाहीत,व २४ तास पाणी पावसात देखील आलं नाही, कंटेनर थिएटर ट्रक मधून खाली उतरलच नाही परंतु शांत सुसंस्कृत शहरात राडे संस्कृती मात्र उदयास आली. आपलीच सत्ता आल्यासारखे गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण टोळके शहरात वाटेल तिथे दादागिरी, धूम स्टाईल मोटारसायकल चालविणे, कोणालाही धमकावणे, मटका स्टॉल उभारणे, दारूच्या बाटल्या वाटेल तिथे पोच देणे, मारामारी असे प्रकार सुरू झाले. म्हणजे गैर धंद्यांना एकप्रकारे ऊत आला. सत्ता येऊन दीड वर्षे उलटून गेले परंतु शहरात सकारात्मक बदल न होता शहर नकारात्मक विचारांकडेच जास्त गेल्याचे दिसून आले.
आज सावंतवाडीत उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून हल्ला झाला त्यात त्यांच्या पती आणि मुलाला भर रस्त्यावर काही मुलांनी मारहाण केली. बघ्यांची गर्दी असूनही हतबल उपनगराध्यक्षा आणि त्यांची कन्या मदतीसाठी याचना करत होत्या. परंतु रस्त्यावर आडवे पाडून, गळा धरून त्यांच्या पतीला मारहाण होत होती. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या भांडणात सर्वसामान्य सोडवायला देखील जात नाही, कारण उद्या ही वेळ आपल्यावर आली तर? परंतु त्यामुळे अशी राडा संस्कृती सावंतवाडीत आज वाढत आहे. गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील एका शहराचे नाव राडा संस्कृतीसाठी गाजत होते, तिथली सत्ता सावंतवाडीत आल्यावर आज सावंतवाडीत तीच राडा संस्कृती फोफावली आहे. आजचा राडा होताना तिथे असलेले पोलीस गायब झाले, परंतु पोलीस पोचायच्या आत सावंतवाडीचे नगराध्यक्ष तिथे पोचले.
आज झालेला वाद हा सावंतवाडीच्या गार्डन समोर उपनगराध्यक्षांच्या लागणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगवरून सुरू झाल्याचे समजते आहे. प्रसाद कोरगावकर हे आपल्या ऍम्ब्युलन्स ने कोरोना काळात किंवा इतर वेळीही गरजू रुग्णांना मोलाची मदत करतात, परंतु सत्तेत आल्यावर उपनगराध्यक्षांचे पती प्रसाद यांच्या बहुतांश टेम्पो ट्रव्हेलर, ट्रक इत्यादी गाड्या कायमस्वरूपी नगरपालिकेच्या भोसले उद्यानच्या पार्किंगमध्ये उभ्या असतात. तसेच खासकीलवाडा भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर त्याठिकाणी देखील काही मोठ्या गाड्या, जेसीबी इत्यादी पार्किंग केलेले असतात. त्यामुळे वादाचे कारण हे बेकायदेशीर रित्या पार्किंग केलेल्या खाजगी गाड्या असू शकेल. त्यामुळे नगरपालिकेच्या जागेत आत्ताच या गाड्या का पार्किंग केल्या जातात? नगरपालिका त्यांना गाड्या कायमच्या उभ्या करण्यास अटकाव का करत नाही? नगरपालिकेने वेळीच अशा गोष्टींवर लक्ष दिल्यास विनाकारण उत्पन्न होणारे वाद देखील टाळले जातील.
काहीच दिवसांपूर्वी माणगाव खोऱ्यातील एका राजकीय पुढाऱ्याच्या कार्यालयावर देखील असाच राडा याच युवकांकडून करण्यात आला होता तेव्हाही नगराध्यक्षांनी मध्यस्ती करून ते प्रकरण मिटविले होते. आजही नगराध्यक्षानाचं तिथे प्रथम धाव घ्यावी लागली. शहरात अवैध दारूचे व्यवसाय, चरस गांजाची विक्री असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्यानेच अनेक युवक त्याच्या आहारी गेलेत आणि आई वडील सुशिक्षित, सुसंस्कृत असून देखील मुले हाताच्या बाहेर जाऊन चुकीच्या मार्गावर गेलीत. या चुकीच्या मार्गावरील मुलांना राजकीय आश्रय मिळाल्यावर त्यांच्याकडून राडेबाजी, दादागिरी केली जाते त्यामुळे शांत सुसंस्कृत शहराची संस्कृती बिघडते, जिल्ह्यात, राज्यात बदनामी होते.
सावंतवाडीच्या या बदनामीला जबाबदार कोण? सावंतवाडीचे सुजाण नागरिकच या बदनामीला जबाबदार आहेत, ज्यांनी या राडे संस्कृतीला खतपाणी घातले. आज सावंतवाडीत सुरू असलेली ही राडेबाजी वेळीच आवर न घातल्यास भविष्यात याची वाढणारी पाळेमुळे खणून काढूनही येणार नाहीत आणि ही राडे संस्कृती म्हणजे एखादा रोग असल्यासारखी सावंतवाडी शहराला चिकटून बसेल.

This Post Has One Comment

  1. रसिका वाटवे

    लेख छान आहे. शांत सुंदर सावंतवाडी वर आम्हा सर्वांचे प्रेम आहे अभिमान आहे. पण अश्या काही घटनांमुळे शहराच्या सुसंस्कृत पणाला बट्टा लागतो. कायदा व सुव्यवस्था जपली जावी हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा.

प्रतिक्रिया व्यक्त करा