जिल्हा खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका प्राप्त होऊन पाच दिवस उलटले तरीही “श्रेयवादामुळे” अद्याप पासिंगविना पडून…
मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा गंभीर आरोप
पणदुर :
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खनिकर्म निधीतून खरेदी केलेल्या रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे प्राप्त होऊन पाच दिवस उलटले तरी “त्यातील काही” पदाधिकार्यांच्या ‘श्रेय वादात’ पासिंग विनापडून आहेत ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गावांचा समाविष्ट असणाऱ्या एकमेव पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेली रुग्णवाहिका कणकवली तालुक्यासाठी वळविण्याचा घाट काही पदाधिकाऱ्यांकडून घातला जातोय, आणि त्यामुळेच पासिंगसाठी विलंब केला जात आहे हे त्यामागचे मुख्य कारण समजते.कुडाळ तालुक्यातील सुमारे आठ उपकेंद्रात असलेला विस्तार व 21 गावांचे कार्यक्षेत्र पाहता पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेली नवीन रुग्णवाहिका मिळणे अत्यावश्यक असताना स्थानिक जि.प.प्रतिनिधी मात्र झोपलेले आहेत का अशी चर्चा पणदूर पंचक्रोशीमध्ये रंगू लागली आहे.
पणदूर आरोग्य केंद्राकडील अस्तित्वात असलेली रुग्णावाहिका अखेरची घटका मोजत असताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मंजूर झालेली रुग्णवाहिका राजकीय वाटाघाटीतून व श्रेय वादामुळे अन्यत्र वळविण्याचा घाट घातला जात असेल तर मनसे याविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांसहित तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.पुढील दोन दिवसांत नवीन रुग्णवाहिका आरोग्य पणदूर आरोग्य केंद्रात सेवेसाठी रुजू न झाल्यास संघर्ष अटळ असून जिल्ह्यातील वाढती कोविड परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनानाने वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनाची करण्याची वेळ आमच्यावर आणू नये असे आवाहनही केले आहे.