You are currently viewing ज्येष्ठ सदस्यास अध्यक्षाचे अधिकार प्रदान करा

ज्येष्ठ सदस्यास अध्यक्षाचे अधिकार प्रदान करा

अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी.

वैभववाडी

महाराष्ट्रातील नऊ जिल्हा ग्राहक आयोगातील अध्यक्षांची पदे रिक्त असल्याने राज्य शासनाने त्या त्या राज्य आयोगातील ज्येष्ठ सदस्यास काम करण्याचे अधिकार तात्काळ प्रधान करावेत, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.छगनजी भुजबळ यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात शासनाच्या अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १८ जानेवारी २०२१ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्रातील ज्या नऊ जिल्हा ग्राहक आयोगांमधील अध्यक्षांचे पदे रिक्त आहे, त्यांचा कार्यभार लगतच्या जिल्हा ग्राहक आयोगातील अध्यक्षांना दिला आहे. परंतु एका दिवशी एकाच आयोगामध्ये उपस्थित राहून कामकाज पाहू शकतात.
त्यामुळे अन्य आयोगाचे कामकाज बंद असून ग्राहकांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. ग्राहकांच्या या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने मॉडेल रुल्स २०२० मधील नियम क्रमांक-६ मध्ये राज्य शासनाने ज्येष्ठ सदस्यास जेव्हा अध्यक्ष उपलब्ध नसतील तेव्हा अध्यक्ष म्हणून कामकाज करण्याचे अधिकार प्रदान करावे असे नमूद केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने त्वरित सूचना काढून अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ सदस्यास अध्यक्ष म्हणून कामकाज करण्याचे अधिकार प्रदान करावेत.
याबरोबर अपवाद वगळता मार्च २०२० पासून बंद असलेले संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य व जिल्हा ग्राहक आयोगाचे कामकाज जून २०२१ पासून पूर्ववत करून दरमहा किमान २०० तक्रारी निकाली काढण्याचे उद्दिष्ट देण्यात यावे. तसेच रविवार वगळता अन्य सर्व सुट्टया रद्द करण्यात याव्यात, अशी मागणीही ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा‌.श्री.एस.एन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर, सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी मेलद्वारे केली आहे. सदर मेलची प्रत मा.उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा