बाहेरचावाडा परिसरात भर वस्तीतील अवैध दारू पार्ट्या जुगार सुरूच.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. शहरातील नागरिक देखील कोरोनाबाबत म्हणावे तेवढे गंभीर नाहीत. सावंतवाडी नगरपालिका शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन तपासणी करत आहे. त्यामुळे बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी काही नाक्यांवर मात्र युवक गोळा होतात, जुगार, दारूच्या पार्ट्या करतात त्यामुळे जोपर्यंत शहरात अशाप्रकारे जमा होणारी गर्दी कमी होणार नाही तोपर्यंत शहरात कोरोनाचा कहर कमी होणार नाही.
शहरातील बाहेरचावाडा येथे नव्याने सुरू झालेल्या पेट्रोलपंप समोर चिकनचे दुकान, सुर्वे दवाखान्याच्या मागील गल्लीतील काही दुकाने, हॉटेल तर दिवसा कधीही सुरू असतात आणि त्या दुकानांवर गर्दी असते. शहरातील बाजारपेठच कोरोना फिरत नसून आजूबाजूच्या दुकानाकडे नगरपालिका, पोलीस प्रशासनाचा होणारा दुर्लक्षच दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढवत आहे. दररोज बाहेरचावाडा येथील पेट्रोलपंपच्या समोर अनेक युवक घोळक्याने बसलेले असतात, त्यातूनच दारू, सिगारेट पिण्याचे धंदे सुरू होतात आणि त्यामुळेच वादंग होतात.
खटावकर हॉस्पिटलच्या वरच्या बाजूस सावंतवाडीतील एका बिल्डरची खाजगी मालमत्ता असून त्याठिकाणी गाडी पार्किंगसाठी उभारलेल्या शेडमध्ये दिवसारात्री जुगाराच्या मैफिली बसतात, दारूच्या पार्ट्या सुरू असतात. एका पक्षाचा पदाधिकारीच हा अड्डा बसवतो. तिथे बसणारे पंधरा वीस लोक जुगार खेळताना कुठले सोशल डिस्टन्स ठेवतात की मास्क लावून असतात? जुगार तर खाकी वर्दीचे कायदेशीर केल्यासारखाच शहरात खेळला जातो आणि पोलिसांचा शहरात जुगाराच्या बैठका बसूनही त्याकडे दुर्लक्ष होतो.
सावंतवाडीत वाढत असलेले कोरोना रुग्ण ही शहराच्या नगरपालिका प्रशासनाचे आणि सावंतवाडी पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात सुरू असणाऱ्या गैरधंद्यांची माहिती ठेवणे आणि गरज पडल्यास पोलीस प्रशासनाचा लक्ष वेधून निदान कोरोना काळात तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अनावश्यक होणारी गर्दी, यावेळी उघडली जाणारी दुकाने यांकडे लक्ष दिल्यास नक्कीच शहरातील कोरोनाचा आकडा आवाक्यात येईल यात शंकाच नाही.
कोरोना केवळ बाजारात फिरणाऱ्यांकडून पसरवला जात नसून शहरात इतरत्र अनावश्यक होणारी गर्दी देखील कोरोना पसरवते.