मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे अशासकीय सदस्यांची मागणी
वैभववाडी.
मार्च २०२० पासून मे २०२१ या कालावधीत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची होणारी मासिक बैठक झालेली नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑफलाईन शक्य होत नसल्यास ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावी अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य यांच्यावतीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मा.श्रीम.के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. सदर मेलची प्रत ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग व अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांना पाठविण्यात आली आहे.
मार्च २०२० पासून जिल्ह्यासह संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सर्व कामकाज व व्यवहार ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने सुरू आहे. मार्च २०२० पासून सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात निर्माण झालेल्या ग्राहक संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांचा निपटारा झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन इतर प्रशासकीय विभागांच्या बैठका होतात त्याप्रमाणे आयोजित करण्यात यावी. ते शक्य होत नसल्यास ऑनलाईन पद्धतीने तरी बैठक आयोजित करण्यात काही हरकत नसावी असे आम्हाला वाटते. आपण योग्य तो निर्णय घेऊन पुढील योग्य कार्यवाही करावी, अशी विनंती सर्व अशासकीय सदस्य यांच्यावतीने प्रा.श्री. एस. एन. पाटील यांनी मेलद्वारे केली आहे.