You are currently viewing कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी….

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी….

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

बारामती :

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी या बाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. ही तत्वे म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना नसून फक्त रुग्णांना मार्गदर्शन व्हावे या साठी जाहिर केलेली असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे.
या मध्ये खालील गोष्टींची काळजी घ्यावी व सूचनांचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
• मास्क, सॅनेटायझरचा वापर व शारिरीक अंतर पाळावे
• आवश्यकतेनुसार दिवसातून गरम पाणी प्यावे
• आयुषच्या सूचनेनुसार प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्यावीत.
• प्रकृती व्यवस्थित असेल तर घरगुती, कार्यालयीन कामे करावीत
• योगासन, प्राणायम नियमित करावे
• श्वासोच्छवासाचे व्यायाम मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार करावेत
• सकाळी व संध्याकाळी फिरण्याचा व्यायाम करावा
• पचायला हलके व ताजे शिजवलेले हलके अन्न सेवन करावे
• पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी
• सिगारेट, दारू व इतर व्यसनांपासून लांब राहावे
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधांचे सेवन करावे
• दररोज तापमान, रक्तदाब, रक्तातील साखर, ऑक्सिजनचे प्रमाण याची तपासणी व्हावी
• कोरडा खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे असल्यास वाफ घ्यावी, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात, आवश्यकता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• कमी न होणारा ताप, श्वसनास त्रास होणे, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, छातीत दुखणे, अशक्तपणा जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे.
• दवाखान्यातून बाहेर आल्यावर नियमित तपासणी करणे.
• जे रुग्ण गृहविलगीकरणात होते, त्यांना काही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तातडीने जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दरम्यान, कोरोनातून मुक्त झालेल्यांनी आपले अनुभव सामाजिक स्तरावर कथन करुन या बाबत सकारात्मक वातावरण तयार करावे, मित्र, नातेवाईक यांच्यासह सोशल मिडीयाच्या माध्यमातून या बाबतची भीती दूर करावी, अशीही अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे. सामाजिक संस्था, बचत गट, कुशल व्यावसायिक यांचेही या साठी सहकार्य घ्यावे, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच समुपदेशकांच्या मदतीने सामाजिक स्वास्थ्य कायम राखण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा