मुदत 15 सप्टेंबर पर्यंत
वृत्तसंस्था :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विविध शिक्षणक्रमांचे ऑनलाइन प्रवेश सुरू आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. त्यानुसार इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना मंगळवार (ता.१५)पर्यंत संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येणार आहे.
संकेतस्थळावरून अर्ज दाखल करता येणार
मुक्त विद्यापीठाच्या राज्यभरातील विभागीय केंद्रांवर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कला, वाणिज्यसह अन्य विद्याशाखांच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. गेल्या २१ जुलैपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली होती.
राज्यभरात कार्यरत असलेली अभ्यास केंद्रे, विद्यार्थ्यांची मागणी तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढविली आहे. यातून विद्यार्थ्यांना विनाविलंब शुल्कासह १५ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज दाखल करता येणार आहे. या संदर्भात विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी परिपत्रक जारी केले.
बी. एड. प्रवेशप्रक्रिया सुरू
विविध पदवी अभ्यासक्रमांसोबत शिक्षणशास्त्र शाखेतील दोन वर्षे कालावधीच्या बी.एड. अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही मंगळवार (ता.१५)पर्यंत मुदत आहे. अर्जाच्या स्वयंसंपादन मुदत १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान असेल.