नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे कॉन्सन्ट्रेटर करण्यात आले सुपूर्द!
कणकवली
कॉंग्रेसचे नेते स्व. वाय. डी. सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत व उद्योजक अनिल सेधा यांनी कणकवली नगरपंचायतने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहेत. यामुळे येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना भासत असलेली ऑक्सिजनची कमतरता तर दूर होणार आहे. त्यासोबत या सेंटरमध्ये या मदतीमुळे रुग्णांना ऑक्सीजन साठी करावी लागणारी धावपळ पण वाचणार आहे.
ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांना कणकवली नगरपंचायतीच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांचे जीव वाचणार आहेत. मकरंद सावंत यांनी यापूर्वी देखील कणकवली नगरपंचायतच्या कोविड सेंटरला भेट देत मदतीचा हात पुढे केला होता. आपल्या वडिलांची समाजकार्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवत असतानाच कोविड काळात जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी होणाऱ्या रुग्णांचे मृत्यू टाळण्याकरिता त्यांनी थेट परदेशातून प्रत्येकी दहा लिटरचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवून ते नगरपंचायत कोविड सेंटरला सुपूर्द केले आहेत.
मकरंद सावंत हे जरी आताच्या राजकीय पटलावरचे नाव नसले तरी त्यांना लाभलेली राजकीय परंपरा व समाजकार्याचा वारसा त्यांनी या माध्यमातून जोपासत कोविडसारख्या महामारीच्या काळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यामार्फत कणकवलीवासीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे हे कॉन्सन्ट्रेटर त्यांनी सुपूर्द केले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, महेश सावंत, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक शिशीर परुळेकर, माजी नगरसेवक बंडू गांगण, कलमठ माजी सरपंच स्वप्निल चिंदरकर आदी उपस्थित होते.