८०० ऑक्सीजन बेड, २०० व्हेन्टीलेटर बेडचा समावेश करा; संदेश पारकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती कोरोनाची संख्या व येणाऱ्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमी पाहता मुंबईच्या धर्तीवर सिंधुदुर्गमध्येही 1000 बेडचे जंबो कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे. यात 800 ऑक्सिजन बेड व 200 व्हेंटिलेटर बेड देणे गरजेचे असून, त्यासाठी लागणारे डॉक्टर्स, नर्स, स्टाफ व लागणारी यंत्रसामग्री मिळणे गरजेचे आहे. अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सध्याची दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या बघता प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड सह 100 बेड उपलब्ध असणारी सुसज्ज कोविड हॉस्पिटल्स उभारणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असुन प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट तयार करणे आवश्यक आहे. तसेच ऑक्सिजन कॉंसंट्रेटर, जंबो सिलिंडर, डुरा सिलिंडर, आयसीयु बेड मोठया प्रमाणात उपलब्ध करुन मिळावेत, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयापासून सर्व कोविड हॉस्पिटलच्या ठिकाणी उपलब्ध बेड व रुग्णांच्या परीस्थिती माहितीसाठी नियंत्रण कक्ष उभारावा अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.