गाव पंचायतीने घातला दोन्ही कुटुंबियांवर बहिष्कार.
सावंतवाडी तालुक्यातील घाटाच्या पायथ्याशी असलेल्या व धार्मिक कार्यात एकजूट असलेल्या एका गावातील आजी माजी लोकप्रतिनिधींच्या कार मधील अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने गावाची बदनामी झाली, त्यामुळे सुसंस्कृत आणि धार्मिक अशी ओळख असणाऱ्या गावकऱ्यांना शरमेने माना खाली घालाव्या लागल्या असे वर्तन करणाऱ्या त्या आजी माजी लोकप्रतिनिधीमुळे संपूर्ण गावाची एकजूट होऊन गाव पंचायत बसली आणि सिंधुदुर्गात गाव पंचायतीची परंपरा नसली तरी गावाची झालेली बदनामी आणि भविष्यात अशी घाणेरडी परंपरा गावात सुरू होऊ नये, गावाचा सन्मान कायम रहावा यासाठी गाव पंचायत बसून एकजुटीने गावाची बदनामी करणाऱ्या दोन्ही कुटुंबावर गाव पंचायतीने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.
स्वतःच्या कारमध्ये बसून आजी माजी लोकप्रतिनिधींनी घाणेरडे कृत्य केले व तिसऱ्या व्यक्तीला त्याचा व्हिडिओ काढावयास लावला म्हणजे अत्यंत शरमेची बाब असून सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल कोणी केला, कसा झाला हा देखील प्रश्न आहे. अशाप्रकारचे वर्तन गावातील जबाबदार लोकप्रतिनिधी करत असतील तर गावातील तरुणांनी कोणाचा आदर्श घ्यावा? त्या लोकप्रतिनिधींच्या घरातील मुलांनी भविष्यात काय आदर्श घेऊन समाजापुढे यावे? असे प्रश्न आज गावकऱ्यांना पडले आहेत.
एकवेळ दादांच्या पुण्याईने गावाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्या महापुरुषांचा आदर्श घेऊन गावाने प्रगती करून गावाची प्रतिष्ठा वाढवीण्यापेक्षा राजकारणातील नवी पिढी गावाला अधोगतिकडे घेऊन चालली आहे. त्यामुळे अशा घाणेरड्या प्रवृत्ती विरुद्ध एक होऊन अशी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आज गाव पंचायत बसली व गावाची बदनामी करणाऱ्या दोन्ही कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.