*जि. प. सदस्य नागेंद्र परब यांनी हिरलोक किनलोस गावात या योजनेच्या कामकाजाची सर्वप्रथम मुहुर्तमेढ रोवली..*
कुडाळ :
केंद्र सरकारच्या “सांसद आदर्श ग्राम” तसेच राज्य सरकारच्या “आमदार आदर्श गाव” ह्या योजनांच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने *जि. प. आदर्श ग्राम* ही नवीन योजना कार्यान्वित केली आहे. या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व प्रकारची कामे ही त्या गावामध्ये प्राधान्याने करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये ती सर्व कामे पूर्ण करून त्या माध्यमातून गावाचा विकास करणे व त्याचबरोबर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यानुसार वर्ष अखेर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांचे मूल्य मापन करून प्रथम तीन गावांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी आपल्या मतदार संघातील हिरलोक-किनलोस हा गाव सदर योजनेसाठी निवडला आहे. आज त्यांनी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन सरपंच, उपसरपंच, सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने चर्चा केली. शुभस्यशीघ्रम या उक्ती प्रमाणे हिरलोक गावामध्ये शोषखड्यांचा शुभारंभ करून या योजनेच्या कामकाजाची सर्वप्रथम मुहुर्तमेढ ही त्यांनी रोवली. या वेळी गावाच्या सरपंचा कु. कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, पंचायत समिती कुडाळ विस्तार अधिकारी श्री.खरात, हिरलोक शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत, सर्व ग्राम पंचायत सदस्य,व हिरलोक किनलोस ग्रामस्थ उपस्थित होते.