रत्नागिरी :
शिवसेना नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली अशी माहिती समोर येत आहे.
रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
“तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली.” असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. राणेंच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. पालकमंत्र्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट झाली का, भेट झाली असल्यास त्याचं नेमकं कारण काय, दोघांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.