अर्थात हाँटेल भारतमाता मधील गरमागरम शिरा,पुरी आणि बटाट्याची खमंग भाजी..…
सुंदरवाडीच्या मध्यभागी मोती तलावाला पाठमोरी अशी आता उभी असलेली सिमेंट- काँक्रीटची दुमजली इमारत म्हणजे भारतमाता हाँटेल. ज्या हाँटेलच गेल्या काही वर्षापासून व्यवस्थापन पहातात आमचे मित्र श्री जगदीश मांजरेकर, जे सातत्याने भंडारी समाज आणि व्यापारी संघामध्ये सक्रिय आहेत.
पण मला आठवत ते सुमारे ३९ वर्षापूर्वीचे मी सावंतवाडीत पहिल पाऊल टाकल त्यावेळच कौलारू भारतमाता हाँटेल. ते किती जुनं आहे याची मला कल्पना नाही. मात्र या हाँटेलला भारतमाता हाँटेल हे नावं का ठेवल असावा, हा माझ्यासाठी एक औत्सुक्याचा प्रश्न आहे. मला आठवत मी १९७८ मध्ये जेव्हा मुंबईत गेलो होतो तेव्हा काही जुन्या हाँटेलांच्या नावाचे बोर्ड वाचत असताना वंदेमातरम्, जयहिंद. अशी देशभक्तीची चेतना जागृत करणारी नावं वाचायला मिळाली. कदाचित त्याच अनुषंगाने मांजरेकर कुटुंबियातील बुजुर्गानी भारतमाता हे नावं ठेवल असाव.
या हाँटेलच्या काऊंटरवर दस्तुरखुद्द हाँटेलचे मालक स्व.मांजरेकर काका बसलेले असायचे. डोक्यावर काळी टोपी, जाड काड्यांचा चष्मा, घोळदार हापपँन्ट, पैरण आणि कपाळावर मध्यभागी भगवा टिळा. त्याना पाहिल्यावर अगदी मनात आदरयुक्त भिती…पण मांजरेकर काका सौजन्यमूर्ती होते. हाँटेलची पायरी चढल्या चढल्या ,”काय बरा आसा मा”? बसा…अशी आदराने चौकशी करायचे..आणि वेटरला हाक मारायचे..
लाकडाची चूल…त्यावर तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपी… मध्येच डोळ्यात गेला तरी नाकाला हवहवासा वाटणारा धुराचा धुरकट वास…धो धो कोसळणाऱ्या पावसात तर एक वेगळीच मजा.आताच्या हाँटेल व्यवसायात आणि आधुनिक पर्यटनात गेल्या चारपाच वर्षात एक नवीन क्रेझ डेव्हलप झाली.
चुलीवरच जेवण आपण मळगाव घाटीत एक बोर्ड बघितला असेल, “येथे अस्सल मालवणी मांसाहारी चुलीवरच जेवण मिळेल.” असे हाँटेल व्यवसायाला आकर्षित करणारे फलक आपल्याला यापुढेही जागोजागी पहायला मिळतील.
पण हाँटेल भारतमाता मधील लाकडाच्या चुलीवर केलेले पदार्थ म्हणजे एक वेगळीच मजा. अगदी सकाळी पाच वाजता पोहे, शिरा, भाजीपुरी तयार.. आणि मांजरेकर काकाही गंल्यावर पुजाआर्चा करुन तयार. आम्ही महाविद्यालयात असताना अनेकदा सकाळी सहा वाजता भारतमातामध्ये नाश्ता करण्यासाठी आवर्जून जात असू. मांजरेकर कांकानी आपल वेळापत्रक एवढ सेट केल होत की एकवेळ घड्याळाची काटे मागेपुढे होतील पण काकांच हाँटेल आणि पदार्थ अगदी वेळेत तयार.
सकाळी सकाळी गरमागरम शिरा, पुरी आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी . त्यावर बारीक कापून शिंपडलेली ओली कोथंबीर आणि मोहरीची फोडणी. खाताना एक वेगळाच आनंद. सकाळी नाश्ता करायचा तर पावल आपोआप भारतमाताच्या दिशेने वळायची. जुन्या काळातील आचारी, जुनी माणसं यांच्या हाताला एक वेगळीच चवं..
आता सगळच बदललं…आचारी..खवय्ये.. अभीरुची…आणि जीवनशैलीही..फास्टफुडमध्ये आपण गुरफटून गेलो..आणि शोधत आहोत..जुन्या काळातील खमंग पदार्थ आणि लाकडाच्या चुली…दुरापास्त झालेल्या गोष्टी फक्त आणि फक्त आठवायच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर एवढच आपल्या हातात… तो गरमागरम शिरा..ती पुरी आणि नाव काढल तरी तोंडाला पाणी आणणारी भारतमाता हाँटेलमधील त्या काळातील बटाटा भाजी शोधावी लागेल…शोधावा लागेल तो खातानाच आनंद आणि समाधानही…
अँड.नकुल पार्सेकर