आमदार वैभव नाईक यांच्यावरच मेहेरनजर
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही तासांचा दौरा केला. दौऱ्याची माहिती देताना देखील मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांना फोनवरून देण्यात आली होती, आणि पाहणी दौरा देखील मालवण येथेच आयोजण्यात आला होता. परंतु जिल्ह्यातील माजी पालकमंत्री तथा सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडमार्ग चे आमदार केसरकर यांच्या वेंगुर्ला तालुक्यातील समुद्र किनारपट्टीच्या गावांकडे दुर्लक्ष करण्यात आला, हेतुपुरस्सर की वेळ अभावी हे समजले नसले तरी वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेचे समर्थक तसेच नुकसानग्रस्त लोक मात्र नाराज झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून दिले ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या दीपक केसरकर यांनीच. त्यामुळे केसरकरांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देखील देण्यात आले.परंतु भ्रष्टाचाराची किड अंगी न लागलेल्या केसरकरांना दुसऱ्या वेळी मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही, पर्यायी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी रत्नागिरी येथून आयात करावी लागली. शिवसेनेने केसरकरांना दुर्लक्षित केल्याचा तोटा फायदा स्थानिक निवडणुकांमधून दिसून आलाच आहे, आणि भविष्यात येणाऱ्या विधानसभेत देखील त्याचे परिणाम दिसून येतील यात शंकाच नाही. परंतु शिवसेना नेतृत्वाने प्रत्येक वेळी केसरकरांकडे दुर्लक्ष केलं तर तो केसकरकरांपेक्षा सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघातील जनतेचा अपमान आहे.
मालवण पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर देखील अतोनात हानी झाली असून शेकडो घरे, माडाच्या बागा, आंब्याच्या बागा जमीनदोस्त झालेल्या आहेत. जिल्ह्यात अपरिमित हानी होऊन देखील मुख्यमंत्री वेंगुर्ला तालुक्याकडे फिरकले नसल्याने वेंगुर्ला तालुक्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी हेतुपुरस्सर केसरकरांना डावलण्यासाठी वेंगुर्ल्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री वेंगुर्ला तालुक्यात न आल्याने तेथील जनता मुख्यमंत्र्यांवरच नव्हे तर वैभव नाईक आणि पालकमंत्री यांच्यावर देखील नाराज झाली आहे.
या मतदारसंघातील जनता ही शांत सुसंस्कृत,संयमी आहे, वेळ येईल तेव्हा ती प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून देते. मतदारसंघातील जनतेने केसरकरांवरील प्रेमापोटी त्यांना राष्ट्रवादी पक्षात असताना एकदा आणि शिवसेनेच्या तिकिटावर दोनवेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली ती केवळ पक्षप्रेम म्हणून नव्हे तर व्यक्तिविशेष म्हणूनच. शिवसेना नेतृत्व आणि नेतृत्वाचे कान भरणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यातील नेत्यांमुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघ शिवसेनेकडून निसटल्यास आश्चर्य वाटू नये.