ज्येष्ठ प्रख्यात संगीतकार राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. अखेर काल रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
राम लक्ष्मण यांचे खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले होते. आपल्या कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती.
त्यांनी संगीतकार राम लक्ष्मण म्हणून इंडस्ट्रीत आपली छाप उमटवली होती. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकापेक्षा एक दमदार गाणी दिली होती. यात ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या चित्रपट आणि त्यातील गाण्याचा समावेश आहे. तसेच त्यांनी राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमांना संगीत दिले आहे. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले होते.
जेव्हा विजय पाटील मुंबईत आले तेव्हा त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले होते. नंतर किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचे निधन झाले. याच काळात ‘एजंट विनोद’चे काम मिळाले. पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. त्यामुळे त्यांनी राम-लक्ष्मण नाव कायम ठेवले होते.