५ हजार कौले, १ हजार पत्रे देऊन घरे उभारण्यासाठी केली मदत
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत ट्रक झाले रवाना
कणकवली
भाजपा आमदार नितेश राणे यांचे दातृत्व आज पुन्हा महाराष्ट्राने पाहिले. चक्रीवादळात अनेकांच्या घरांची कौले, छताचे पत्रे उडून गेलेत, अशा कुटुंबांना घर शाकारणी करण्यासाठी लागणारे साहित्य, कौले, पत्रे देऊन आमदार नितेश राणे यांनी मदतीचा हात दिला. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे साहित्याने भरलेले ट्रक मदत पोहोचविण्यासाठी रवाना झाले.
तौक्ती चक्रीवादळाने सिंधुदुर्गात घरांचे छप्पर होत्याचे नव्हते झाले…काहींची कौले फुटली तर काहींच्या घरावरील सिमेंटचे पत्रेच उडून गेले. कोरोनाच्या संकटात हाताला रोजगार नसल्यामुळे हवालदिल झालेल्या गोरगरिबांची घरे वादळाच्या तडाख्याने चंद्रमौळी झाली. संकटकाळात नेहमीच जिल्हावासीयांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी या वादळ संकटातही वादळबधितांना साथ दिली आहे.
५ हजार कौले आणि १ हजार सिमेंट चे पत्रे आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घर शाकारण्यासाठीचे हे साहित्य वादळबाधितांना देण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,उपाध्यक्ष राजू राऊळ,पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महेश सावंत आदी उपस्थित होते.