पालकमंत्री व खासदारांकडे विशेष आर्थिक पॅकेजची केली मागणी
तौक्ते वादळाचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संदेश पारकर यांनी देवगड तालुक्याचा दौरा करुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, मत्स्य अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांची यांची भेट घेऊन त्यांच्याशी नुकसानभरपाई संदर्भात चर्चा केली. तसेच त्वरीत पंचनामे करुन जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी देखील केली.
जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे, बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. घरांवर, गोठयांवर झाडे पडली आहेत, घराची छपरे उडुन गेली आहेत. काही मच्छिमारांच्या नौका बुडाल्या आहेत, तर काहींच्या नौकांचे व जाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका खलाशाचा मृत्यु झाला आहे तर तिघे खलाशी बेपत्ता आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचे पोल पडुन विद्युतप्रवाह बंद पडलेला आहे. त्यामुळे अनेक गावांत पुढचे काही दिवस लाईट पण येणार नाही अशी परिस्थिती आहे.
या सर्व गंभीर बाबींची संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांना फोन वरुन माहिती दिली. तसेच जिल्ह्यात झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी देखील केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी संदेश पारकर यांना दिली. तसेच आज संध्याकाळ पर्यंत विद्युत विभागाच्या 15 टिम जिल्ह्यात दाखल होऊन त्वरीत विद्युत व्यवस्था सुरु करण्यासाठी काम करणार असल्याची माहिती खासदार राऊत यांनी श्री.पारकर यांना दिली. यावेळी तालुकाप्रमुख विलास साळसकर, बुवा तारी, संतोष तारी, तुषार पेडणेकर व नुकसानग्रस्त उपस्थित होते.