You are currently viewing विकासकामे करताना सावंतवाडी नगरपालिकेचा नागरिकांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष.

विकासकामे करताना सावंतवाडी नगरपालिकेचा नागरिकांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष.

दोन वर्षे रस्त्यावर तलाव होत असून पालिका सुशेगाद.

सावंतवाडी शहराची शान असलेले जगन्नाथराव भोसले उद्यान नगरपालिकेने अतिशय सुंदर असे विकसित केले असून मध्यंतरी मिळालेल्या नगरोत्थान निधीतून उद्यानाला सुसज्ज अशी कंपाऊंड वॉल बांधण्यात आली. सुसज्ज अशा वॉलमुळे भोसले उद्यानाचे स्वरूप देखील बदलून गेले. जगन्नाथराव भोसले उद्यानच्या सौंदर्यात त्यामुळे भर पडली.
नगरपालिकेने उद्यानाचा विकास करताना उद्यानाच्या बाजूने बागकर रस्ता नावाने असलेला सालईवाडा तसेच मिलाग्रीस हायस्कुल कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुर्दशेकडे साफ दुर्लक्ष केला. सदरच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, या रस्त्यावरून मागील बाजूला असलेली कॉलनी, तीन मोठी गृह संकुले अशी शेकडो लोकांची जा ये सुरू असते तसेच शाळा सुरू असताना शाळेची मुले याच रस्त्यावरून घाणीच्या पाण्यातूनच जात असतात. पादचार्यांचे कपडे देखील घाणीच्या पाण्याने खराब होतात. संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत लोकांना हा त्रास सहन करावा लागतो परंतु नगरपालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. सावंतवाडीचे मुख्याधिकारी जावडेकर हे देखील त्यांच्या मागील कार्यकाळात याच ठिकाणी राहत होते, याच रस्त्यावरून ये जा करत होते, परंतु गार्डनच्या मागील गेटवर असलेल्या फूटभर खोल खड्ड्यातील पाण्यातून जाणारे नागरिक आणि खड्डा पाहून देखील त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांकडून उपाययोजना करून घेतली नाही. आमदार केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, यांना तेथील नागरिकांनी वेळोवेळी रस्त्याच्या सुधारणेसाठी विनंती केली होती, परंतु मतदानाच्या प्रचारानंतर मात्र यापैकी कोणीही ते गांभिर्याने घेतले नाही. कंपाऊंड वॉल बांधताना तत्कालीन मुख्य अभियंता पालव यांना कंपाउंड वॉलसाठी खोदलेल्या चरातून पाण्यासाठी गटार ठेवण्याच्या सूचना देखील नागरिकांनी केल्या होत्या, परंतु विकासकाम करताना त्यापासून नागरिकांना काय त्रास होईल याचे भान नसल्याने आज रस्त्यावर तलाव सदृश्य परिस्थिती झाली असून नागरिकांना घाणीच्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. सर्वसामान्य घर बांधणाऱ्यांचे बांधकाम साहित्य रस्त्यावर आले तर त्यांना दंड करणारी पालिका मिलिटरी हॉस्टेलने गटार बुजवलेला असताना देखील तो मोकळा करून घेत नाही, त्यामुळे हायवेवरून येणारे पाणी सरळ रस्त्यावरून वाहते.
लाखो करोडोंचा निधी उद्यान कामासाठी खर्च करताना नागरिकांच्या पायाभूत सुविधांकडे सावंतवाडी नगरपालिका लक्ष देणार आहे का? असा सवाल सालईवाडा येथील नागरिक उपस्थित करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा