सावंतवाडी
सावंतवाडीतील प्रसिद्ध वकील अलसुहेब सत्तार डिंगणकर (४८, रा. सालईवाडा ) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गेली २४ वर्षे त्यानी सावंतवाडीतील न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांचे वडील ॲड. सत्तार डिंगणकर हे देखील वकील व्यवसायात होते. ॲड. सुहेब हे अतिशय मनमिळावू शांत स्वभाव आणि सर्वांशी एकोप्याने राहणारे अशी त्यांची वकिली क्षेत्रात ओळख होती. सावंतवाडी बार असोसिएशनच्या समितीत काही वर्ष त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. सावंतवाडी वकिली क्षेत्रात क्राईम वकील म्हणून त्याचा हातखंडा होता. लेदर क्रिकेट खेळाची त्यांना फार आवड होती. सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या क्रिकेट संघांचे ते अष्टपैलू खेळाडू होते. हा संघही चांगल्या प्रकारे तयार केला होता. अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वाची अखेर मात्र दुदैवी झाली. त्यांच्या आकस्मिक निधनाने सावंतवाडी तालुका बार असोसिएशनमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आम्ही मुकलो अशा शब्दात वकिल मित्रांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई असा परिवार आहे.