जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सांघिक कामाची गरज असताना जिल्ह्यात विकासापेक्षा श्रेयवादातच अनेकांना रस आहे; परंतु मी जिल्ह्याच्या विकासात कुठेही राजकारण आणणार नाही. कारण श्रेयापेक्षा जनतेचे आरोग्य आम्हाला महत्वाचे आहे, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केले.
कोरोनाची सद्यस्थिती, आरोग्यासाठी शासनपातळीवर घेतलेले महत्वपुर्ण निर्णय आणि तालुक्यातील प्रलंबित विकासकामे याविषयीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांतधिकारी वैशाली राजमाने, तहसिलदार रामदास झळके, संदेश पारकर, अतुल रावराणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, डॉ. एम. बी. सोनावणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, मुख्याधिकारी सुरज कांबळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ‘खनिकर्म विभागाकडून १ कोटी ८० लाख रूपये किंमतीच्या १२ रूग्णवाहिका खरेदी करून त्या जिल्हा परिषदेकडे सुपुर्द केल्या आहेत. या खनिकर्म विभाग समितीचा अध्यक्ष पालकमंत्री असतो. तरीदेखील या रूग्णवाहिकांचे श्रेय काहीजण घेत आहेत. आतापर्यत खनिकर्म विभागाकडून रूग्णवाहिका खरेदी करता येतात हे देखील अनेकांना माहित नाही. मुख्यमंत्र्यानी जिल्ह्याला जाहीर केलेल्या पॅकेजमधून सहा रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील काहींना विकासापेक्षा श्रेयवादातच अधिक रस आहे; परंतु मला जनतेचे आरोग्य महत्वाचे असून त्यासाठी काम करीत आहे.
कोरोना संकटात राजकारण करण्यापेक्षा सांघिकपणे काम करून जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.” तालुक्यातील सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रूग्णवाहिका मंजुर करण्यात आली आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन प्लांटला मंजुरी मिळाली आहे तर येथे १० ऑक्सीजन बेडचे हॉस्पीटल सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सेमी विद्युतदाहिनी देखील मंजुर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समिती इमारतीसाठी ३७ लाख रूपयांचा निधी मंजुर केला असून त्या कामाला लवकरच प्रशासकीय मंजुरी लवकरच मिळणार आहे. शहराचा पाण्याचा प्रश्न देखील नगरपंचायत निवडणुकीपुर्वीच सोडविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. महाराणा प्रतापसिंह कलादालनाकरीता २५ लाखांचा निधी पर्यटन किंवा नगरोत्थान विभागाकडून मंजुर करुन देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
वैभववाडी शहरातील विविध ११ विकासकामांसाठी २ कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यापुर्वी इतका निधी कधीही आलेला नाही. तरीदेखील काही लोक आपल्यावर टिका करीत आहेत; परंतु ंमी किती निधी वैभववाडीसाठी आणला आणि टिकाकारांनी किती आणला? याचा लेखाजोखा निवडणुकीच्या वेळी मांडला जाईल, असे पालकमंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. आठ दिवसांत उंबर्डे-फोंडा रस्ताकाम उंबर्डे-फोंडा या प्रलंबित रस्ता कामाला मंजुरी मिळाली असून निवीदा प्रकिया पुर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.