कोरोनापेक्षा बदनामीच्या भीतीने लोक राहतात घरात.
विशेष संपादकीय…..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येता येत नाही, जिल्हास्तरावरून प्रयत्न होऊनही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन कडक केल्यावर सामान भरण्यासाठी बाजारपेठेत दोन दिवस लोकांची झुंबड उडाली आणि तेव्हापासून ३०० च्या आसपास असणारी रुग्णसंख्या प्रतिदिन ५००/६०० चे आकडे पार करून गेली, त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्या करिता केलेल्या कडक लॉकडाऊनचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच झाल्याचे दिसून आले आहे.
गेला आठवडाभर जिल्ह्यात ६०० च्या आसपास रुग्ण रोज पॉझिटिव्ह मिळत असून सरासरी १५ रुग्ण रोज दगावलेले दिसून येतात. शासनाने घरोघरी सर्व्हे करून कोरोनाग्रस्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास, स्वॅब तपासणी करण्याकरिता आवाहन केले आहे. त्यामुळे जागृत झालेले काही लोक कोरोनाची लक्षणे दिसल्यास भीतीपोटी टेस्ट करून रुग्णालयात दाखल होतात. परंतु त्याचीच दुसरी बाजू प्रकर्षाने समोर येत आहे ती म्हणजे “आपल्याला कोरोना झाला हे आपल्या वाड्यात, गावात समजले तर आपली बदनामी होईल, लोक घर बहिष्कृत करतील, या भीतीपोटी गावागावात लोक टेस्ट न करता घरातच उपचार घेतात आणि बऱ्याचदा कोरोना वरचढ ठरतो त्यामुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. बऱ्याच गावांमध्ये जिथे कोरोना रुग्ण भेटतो ते घर अक्षरशः बहिष्कृत करतात अशी परिस्थिती आज गावागावात आहे.
मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनामुक्त झाल्यावर लोक १४ दिवसांनी कामावर जायला लागतात. सोसायटींमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोक संशयाने पहायचे परंतु आता तशी परिस्थिती नाही. घरी काम करणाऱ्या बाया देखील कामाला यायला लागतात. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये हा सुसंस्कृतपणा दिसून येतो, तोच सुसंस्कृतपणा गावातील शिकलेल्या समाजामध्ये का दिसून येत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक स्वतः काळजी घेताना दिसत नाहीत, परंतु शेजारच्याला कोरोना झाला तर मात्र त्याला, त्याच्या घराला वाळीत टाकल्यासारखे वागतात. त्यामुळे कित्येकांना मनस्ताप होतो व लोक आपला आजार लपवून घरात राहतात. समाजातील समजदार व्यक्तींनी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्यसेवक इत्यादींनी समाजाचे प्रबोधन करून अनावश्यक भीती घालवून त्यांना मास्क वापरणे, सॅनिटायझर अथवा साबणाने हात स्वच्छ धुवणे आदी बाबींबाबत जागरूक केले पाहिजे. समाज प्रबोधन झाले तरच लोकांची विकृती जाऊन संस्कृती दिसून येईल आणि एखाद्या घरात कोरोनाग्रस्त रुग्ण असल्यावर त्या घराकडे पाहण्याचा माणसांचा दृष्टिकोन बदलेल.
कोरोना झाला म्हणजे माणूस अस्पृश्य अथवा घर बहिष्कृत होत नाही. कोरोना कोणालाही होऊ शकतो. आजारापेक्षा आजारावर लोकांकडून केल्या जाणाऱ्या कृत्यामुळे, प्रतिक्रियांमुळे गावागावात लोक आजार लपवून घरात राहू लागले, परिणामी जिल्ह्यात गंभीर झाल्यावर रुग्णालयात धाव घेण्याची मानसिकता वाढली आणि मृत्युदर वाढत गेले.
जिल्ह्यातील लोक सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत परंतु आपला सुसंस्कृतपणा आणि सुशिक्षितता कोरोनाच्या महामारीत दाखविणे गरजेचे असून, कोरोना सदृश्य लक्षणे बदनामीच्या भीतीने आजार लपवून घरात उपचार करत न राहता टेस्ट करून सरकारी दवाखान्यातून मोफत इलाज केले जातात ते करून घेणे म्हणजे आपला जीव वाचविणे हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवावे.
आजार कधीही मोठा नसतो तर आजाराची भीती सर्वात मोठी असते.