मुख्य कार्यकारी अधिकारी,(ग्राप) जि.प. सिंधुदुर्ग श्री.प्रजित नायर साहेबांनी प्रलंबित असलेल्या तक्रार अर्जाची कार्यवाही तात्काळ करण्याकरिता दिलेल्या आदेशाबाबत भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेने व्यक्त केले आभार.
वेंगुर्ला
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने आरवली सोंन्सुरे येथील जिल्हा परिषदेने सन २०१९-२० मध्ये रु. १,७५,४२४/- या स्वनिधी मधून “गणेश घाट बांधणे” या बांधकामातील अनियमितता, गैरव्यवहार व जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील अपहाराबाबतची तक्रार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.पं. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना जा.क्र.१६/२०२०, दिनांक २०/७/२०२० रोजी सादर केली होती. या प्रकरणातील संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीची चौकशी ही २७८ दिवस जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याने जा.क्र. ३२/२०२१, दिनांक ३/५/२०२१ रोजी पुनःश्च पुराव्यासह स्मरणपत्र मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग श्री.प्रजित नायर,भाप्रसे. यांना संस्थेच्यावतीने राजन रेडकर यांनी सादर केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषद, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांच्यामार्फतीने दिनांक १४/५/२०२१ रोजी १२.३० च्या दरम्यान आरवली सोंन्सुरे येथील गणेश घाट बांधण्यात आलेल्या जागी पाहणी करून पंचनामा करण्यात आला. सदर वेळी संस्थेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री चव्हाण, संस्थेचे राजाराम@आबा चिपकर, विश्वनाथ@सिद्धेश शेलटे, बाळा जाधव, आरवली सरपंच तातोबा कुडव, ग्रामपंचायत सदस्य समीर कांबळी, ग्रामसेवक विनय धाकोरकर, ग्रामस्थ उदय चिपकर, ग्रामपंचायत क्लार्क बाबू रगजी हे उपस्थित होते. गणेश घाटाच्या नावावर ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या दुसऱ्या कामाचे मोजमाप कार्यकारी अभियंता तथा चौकशी अधिकारी श्रीपाद पाताडे यांनी सर्वांच्या समक्ष घेतले. ज्या मंजूर करण्यात आलेल्या ठरवाप्रमाणे काम करायचे होते, तो गणेश घाट बांधण्यातच आलेला नव्हता. सदर ठिकाणी गणेश घाट बांधण्यातच आलेला नसल्याचे संस्थेचे राजाराम @आबा चिपकर यांनी चौकशी अधिकारी श्री. पाताडे यांना सर्वांसमक्ष माहिती दिली. तसेच घटनास्थळी गावातील ग्रामस्थ उदय चिपकर यांनीही गणेश घाट बांधण्याच्या जागी दुसरेच निकृष्ट काम केल्याचे सांगितले आहे.
“गणेश घाट बांधणे” या जिल्हा परिषदेच्या बांधकामात करण्यात आलेली अनियमितता, गैरव्यवहार तसेच आरवली ग्रामपंचायतीने पदाचा दुरुपयोग करून ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने जिल्हा परिषदेच्या शासकीय निधीचा अपहार करून सदर जागेवर गणेश घाट बांधण्याचे काम झाल्याचे भासवून, त्या कामाचे खोटे कागदपत्र व पंचनामा बनवून शासनाची फसवणूक व दिशाभूल करून भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे.
गणेश घाट बांधणे या कामाशी संबंधित असलेले, ज्यांनी अस्तित्वात नसलेला गणेश घाट बांधकाम हे अस्तित्वात आहे, असे भासवून शासकीय निधीचा अपहार करणारे बांधकाम विभागाचे अभियंते, ठेकेदार व खोटा पंचनामा करणारे आरवली ग्रामपंचायातीचे माजी सरपंच, सदस्य, पोलीस पाटील व इतर हे यास सर्वस्वी जबाबदार असून त्यांचेवर याबाबत जबाबदारी निश्चित करून ग्रामपंचायत अधिनियमान्वये नियमनुकूल कारवाई होऊन त्यांनी संगनमताने कामात केलेली अनियमितता, गैरव्यवहार, फसवणूक व अपहाराबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश होण्याबाबत विनंती केलेली आहे. तसेच संस्थेच्या वतीने दाखल केलेल्या मुळ तक्रार चौकशी अर्जास बुद्धिपुरस्सर विलंब करून संबंधितांना पाठीशी घालणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यांनी २७८ दिवस प्रकरण प्रलंबित ठेवल्याने त्यांचेवर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचेवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी राजन रेडकर यांनी केलेली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर, भाप्रसे यांनी संस्थेच्या प्रलंबित असलेल्या अर्जाच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिल्याबाबत, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने राजन रेडकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.