You are currently viewing कोरोना कक्षातील नातेवाईकांची गर्दी धोकादायक

कोरोना कक्षातील नातेवाईकांची गर्दी धोकादायक

जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज

कणकवली
जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षासह तालुका व ग्रामीण स्तरावरील कोविड कक्षामध्ये कोरोना बाधितांच्या नातेवाईकांचा खुला वावर दिसून येत आहे. जेवण व अन्य साहित्य पुरविण्याच्या बहाण्याने अनेक नातेवाईक थेट कोरोना बाधितांचे बेडपर्यंत वावरताना दिसून येत आहेत. नातेवाईकांचा हा मुक्त वावर कोरोना प्रसारासाठी मदत करणारा आहे. सहाजिकच जिल्ह्यात कोरोना प्रसार यामुळे वाढण्याची भीती आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याची गंभीरतेने दखल घ्यावी व योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली आहे.

श्री.पिळणकर म्हणाले, नियमानुसार डॉक्टर व परिचारिका वगळता कोरोना कक्षामध्ये अन्न कुणालाही थेट प्रवेश नसतो. मात्र जिल्हा रुग्णालय कोरोना कक्षासह जिल्हाभरातील काही कोरोना कक्षात रुग्णांच्या नातेवाईकांचा खुलेआम वावर दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालय कोरोना कक्षात याचा अनुभव आपण स्वतः घेतला आहे. नातेवाईकांचा हा वावर कोरोना प्रसाराला निमंत्रण देणारा आहे. कारण हेच नातेवाईक बाहेर जाऊन समाजात, कुटुंबात मिसळत असतात. त्यांच्यापासून अन्य नागरिकांना कोरोना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना आजार आरोग्य योजनेत बसवावा..

शासकीय कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधितांवर मोफत उपचार होतात. मात्र, कोरोना बाधितांचे वाढते प्रमाण व शासकीय रुग्णालय यांची क्षमता पाहता अनेक जणांना कोरोना वरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

खाजगी रुग्णालयांमधून या रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जाते. परिणामी गोरगरीब कोरोना बाधितांना खाजगी रुग्णालयांमधून उपचार घेणे परवडत नाही. यासाठी राज्य व केंद्र शासनाने कोरोना आजाराचा समावेश एखाद्या शासकीय आरोग्य योजनेत करावा, यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंत्रालयात भेट घेणार असल्याचे श्री. पिळणकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा