You are currently viewing ​”खारेपाटण चेक पोस्ट येथे आरोग्य व महसूल विभागांसाठी सर्व सोयी सुविधा असलेली इमारत कायमस्वरूपी बांधण्यात यावी … ” – सूर्यकांत भालेकर

​”खारेपाटण चेक पोस्ट येथे आरोग्य व महसूल विभागांसाठी सर्व सोयी सुविधा असलेली इमारत कायमस्वरूपी बांधण्यात यावी … ” – सूर्यकांत भालेकर

खारेपाटण

​सध्या राज्यासह संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला असून हा कोरोनाचा उद्रेक अजून किती काळ चालत राहणार हे देखील सांगणे कठीण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेकपोस्ट येथील कार्यरत असलेल्या महसूल व आरोग्य पथकातील कर्मचारी वर्गासाठी कायमस्वरूपी सर्व सोयी सुविधा असणारी इमारत बांधण्यात यावी अशी मागणी खारेपाटण भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी जिल्हा तपासणी नाका येथे कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची तपासणी आणि नोंदणी करण्यासाठी खारेपाटण चेकपोस्ट येथे महसूल व आरोग्य अशी दोन पथके कार्यरत आहेत.मात्र या ठिकाणी असलेल्या जुन्या चेकपोस्ट च्या इमारती पुढे साधी पत्र्याची शेड मारून तपासणी नाका तात्पुरत्या स्वरूपात बनवला गेला असून या इथे कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गासाठीं पाणी,स्वच्छता गृह व ​शौचालय यांसारख्या सुविधा येथे उपलब्ध नसल्याने येथे कार्यरत असलेल्या विशेषतः महिला कर्मचारी वर्गाची स्वछतागृहअभावी फार मोठी गैरसोय होत आहे.

त्यामुळे याठिकाणी महसूल आणि आरोग्य विभागमार्फत एक कायमस्वरूपी सर्व सोयी सुविधा असलेली नवीन चेकपोस्ट इमारत उभारणे अत्यन्त आवश्यक असल्याचे देखील या निवेदनात सूर्यकांत भालेकर यांनी म्हटले आहे.
तसेच नजीकच्या काळात परजिल्ह्यातील आणखी नागरिक आपल्या जिल्ह्यात येण्याची शक्यता गृहीत धरून खारेपाटण चेकपोस्ट येथे कार्यरत असलेली महसुल व आरोग्य पथके ही अजून काही महीने कार्यरत राहणार असे दिसते.त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य पथक व महसूल पथकाकरीता कायमस्वरूपी इमारत बांधण्यात आली तर येथील कर्मचारी अधिक चांगले काम करू शकतील व कोरोनाला धेर्याने तोंड देत त्याच्याशी लढतील. तरी माझ्या या मागणीचा शासनाने विचार करावा व लवकरात लवकर कार्यवाही करावी.अशी विनंती देखील जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात सूर्यकांत भालेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा