जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांचे जिल्हाधिऱ्यांना निवेदन
देवगड :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना निवेदन सादर केले आहे.
कोरोना प्रसार रोखण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात येत्या शनिवार पासून संपूर्ण टाळेबंदी घोषित होणार असल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून प्रकाशित झाल्या आहेत. आपला जिल्हा वाणसामानादी सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी पूर्णपणे कोल्हापूर बाजारपेठेवर च अवलंबून आहे.
आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण टाळेबंदी येत्या 15 तारीख पासून शिथिल होणार आहे. आणि नेमका त्याच वेळी कोल्हापूर वरून जीवनावश्यक वस्तू येणे बंद झाले तर सिंधुदुर्गात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होईल त्यामुळे अपरिमित अशी भाव वाढ होण्याची शक्यता आहे. यातून कोरोनामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांची हालत अधिकच गंभीर होऊ शकते/ त्यामुळे नागरिकांच्या रोषाला स्थानिक प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे.
सबब या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपण माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याशी संपर्क करून आपल्या जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.