महसूल विभागाच्या हलगर्जीपणामूळे रेडी गावातील नुकसानग्रस्त शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित – भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचा आरोप.
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे २६ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणात रेडीतील मायनिंग कंपनीने शेतकऱ्यांच्या खाजगी शेतजमिनीत टाकावू माती व चिखलाचे पाणी सोडून जमीन कायमस्वरूपी नापीक केल्याने त्याची नुकसानभरपाई मिळावी याकरिता मागणी केली होती. याबाबत संस्थेने केलेल्या अर्जास अनुसरून जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी १३/१/२०२१ रोजी तहसीलदार वेंगुर्ला यांना तालुका कृषी अधिकारी वेंगुर्ला यांच्या मदतीने संयुक्त पाहणी करून झालेल्या नुकसनीबाबत नियमोचित कार्यवाही करण्याबाबत पत्राने कळविले होते.
शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जास अनुसरून तहसीलदार वेंगुर्ला श्री.प्रविण लोकरे यांनी सदर जमिनीचा पंचनामा करण्याचे आदेश मंडळ अधिकारी शिरोडा श्री.भानुदास चव्हाण यांना दिनांक १६/७/२०२० रोजी देण्यात आले. त्याप्रमाणे श्री.चव्हाण यांनी दि. २८/७/२०२० रोजी पंचनामा केला. श्री. चव्हाण यांनी केलेल्या पंचनाम्यात मायनिंग कंपनीने डम्प केलेली टाकावू माती व चिखल पावसाच्या पाण्याने वाहून आल्याने आठ ते नऊ एकर क्षेत्रामध्ये पसरल्याचे नमूद करून पंचयादी केलेली आहे.
महसूल विभागाच्या नियमानुसार श्री. चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी तर केली परंतु त्यांनी शेतकऱ्यांच्या महसूल अभिलेख सात बारा प्रमाणे क्षेत्र पडताळणी व मोजमाप घेऊन नुकसान भरपाईचा स्वयंस्पष्ट अहवाल तहसीलदार, वेंगुर्ला यांना सादर करणे गरजेचे होते. श्री. चव्हाण यांनी शेतजमिनींचा आठ ते नऊ एकर जमिनीचा अंदाजे पंचयादी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास विलंब व्हावा या हेतूने, जाणीवपूर्वक दिशाभूल करून पंचयादीचा देखावा केलेला आहे. श्री. चव्हाण यांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामूळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईस विलंब सहन करावा लागत आहे. तसेच तहसीलदार वेंगुर्ला यांनी पहिली पंचयादी स्वयंस्पष्ट नसल्याने श्री. चव्हाण यांना फेर पंचयादी करण्याचे आदेश दिले. परंतु त्यांनी पंचयादी करण्यास जवळपास चार महिने जाणीवपूर्वक विलंब केल्याने त्यांचेवर सामान्य प्रशासन विभागाच्या, शासन परिपत्रकानुसार प्राप्त झालेल्या निवेदनावर दुर्लक्ष करून निर्णय घेण्यास टाळाटाळ केल्याने तसेच सदर कार्यवाही १२ आठवड्यात पूर्ण न केल्याने, परिपत्रकातील आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचेवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी राजन रेडकर यांनी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, प्रांताधिकारी सावंतवाडी, तहसीलदार वेंगुर्ला यांना निवेदनात केलेली असून या गंभीर प्रकरणाची कायदेशीर दखल घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
श्री.भानुदास चव्हाण हे महसूल विभागात मंडळ अधिकारी, शिरोडा येथे वरिष्ठ पदावर काम करीत असतांना पंचयादीत आठ ते नऊ एकर असा उल्लेख करून, अशा प्रकारची अंदाजे पंचयादी करून त्यांनी शासनाचा वेळ वाया घालवलेला आहे. याकरिता श्री. चव्हाण यांना पंचयादी कशी करायची असते याची माहिती घेण्यासाठी कार्यशाळेची आवश्यकता आहे असे दिसून येते.
तसेच सदर शेतजमिनीची पंचयादी ही तालुका कृषी अधिकारी, वेंगुर्ला यांना तात्काळ वर्ग करून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पंचयादी करण्याचे आदेश तहसीलदार वेंगुर्ला यांनी द्यावेत अशी विनंती शेतकरी व संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे.
रेडी खाडीत मागील दोन वर्षांपासून स्थानिक वाळूमाफियांकडून रात्रीची होत असलेली वारेमाप अवैध वाळू उत्खनन ही देखील मंडळ अधिकारी शिरोडा श्री. भानुदास चव्हाण यांच्याच कार्यकाळात होत होती. वाळूमाफियांकडून दोन वर्षात जवळपास ५ करोड रुपयांची अवैध वाळू उपसा करून, त्याची विक्री करून, वाळू चोरी व महसुलाचे नुकसान केल्याची तक्रार मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, प्रांताधिकारी सावंतवाडी व तहसीलदार वेंगुर्ला यांना संस्थेच्यावतीने यापूर्वी करण्यात आलेली आहे.