आचरा पारवाडी व डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्प बंद करण्याबाबत ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार मालवण तहसीलदार यांच्या उपस्थितीत समबंधित प्रकल्प जागेची संयुक्त पाहणी झाली होती या पहाणीनंतर कोणतीही पुढे कार्यवाही न झाल्याने आचरा पारवाडी डोंगरेवाडी ग्रामस्थांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली आहे.
आपण आचरा पारवाडी व डोंगरेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पारवाडी येथील कोळंबी प्रकल्प बंद करण्याबाबत प्रकल्पाची पाहणी आपल्या सुचनेनुसार संबंधित खात्यामार्फत २३ एप्रिल या दिवशी तहसिलदार यांच्या मार्फत बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली. त्यावेळी कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील इ. उपस्थित होते. दि. २४ एप्रिल रोजी कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वनविभाग तसेच दि. ०३ मे रोजी पतन विभाग यांच्या मार्फत पाहणी करून अहवाल देतो असे सांगण्यात आले होते. तरी या पहाणी बाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून पंधरा दिवस होवून ही आम्हा ग्रामस्थांना कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही किंवा प्रकल्पावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. आमच्या पारवाडी, डोंगरेवाडीतील जलस्त्रोत दिवसें दिवस अधिक दुषित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्याचबरोबर पावसाळा हंगाम काही दिवसांवर आल्याने ग्रामस्थांमध्ये पूरपरिस्थितीची भिती निर्माण झाली आहे. म्हणून आपण समस्यांबात ग्रामस्थांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हा ग्रामस्थांना वेळीच न्याय द्यावा अशी विनंती निवेदनात केली आहे.