You are currently viewing नियमावलीत शिथिलता…

नियमावलीत शिथिलता…

प्रवासासाठी RT_PCR टेस्ट बंधनकारक नाही, विना टेस्ट रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

 

केंद्र आणि राज्य सरकारांकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी  सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. मागील आठवड्यात एका दिवसात 4 लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली होती. मात्र, चालू आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय. देशातील 18 राज्य आणि केंद्राशासित प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नियमावलीत शिथिलता देण्यात आलीय.

मंगळवारी कोरोना टेस्टिंगबाबतच्या नियमावलीत  केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. त्यानुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा झाल्यास RT_PCR टेस्ट करणं आता बंधनकारक असणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यात प्रवेश करण्यासाठी RT_PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलं होतं. खासकरुन महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना अन्य राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.

केंद्राच्या नव्या नियमावलीनुसार  कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना आता RT-PCR टेस्ट बंधनकारक नसेल. मात्र, डिस्चार्ज मिळवताना रुग्णाच्या कोरोना लक्षणांमध्ये मोठी सुधारणा गरजेची आहे. कोरोना रुग्णाला 5 दिवसांपासून ताप नाही, तर त्याला रुग्णालयातून सुट्टी घेताना RT-PCR टेस्ट करणं गरजेचं नसेल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं म्हटलंय. त्यात दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा, चंदीगड, लडाख, दीव-दमण, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार या राज्यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 18 =