वेंगुर्ला तालुक्यात शिवसेनेला दोन जबर धक्के.
सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृत्य होण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचे कैवारी आणि लोकनेते म्हणून नावारूपास आलेल्या लोकप्रतिनिधींचे निधन होणे हे जिल्ह्याच्या आणि त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असताना देखील बरेच कोरोनाचे रुग्ण आपल्या भक्कम शरीरयष्टीमुळे आपल्याला काही होणार नाही या गैरसमजात राहतात, आजार अंगावर पेलतात आणि आजार वाढून गंभीर होतात शेवटी उपचार करून देखील अनेकांना मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येते.
कोविड-१९ चा सर्वात जास्त फटका वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेला बसला असून शिवसेनेचे ढाण्या वाघ समजले जाणारे दोन माजी पंचायत समिती सभापती जिल्हा उपाध्यक्ष आबा कोंडस्कर व जि. प. सदस्य सुनील म्हापणकर यांचा अकाली मृत्यू झाला. कमी वयात पंचायत समिती सभापतिपदी बसलेले आबा कोंडस्कर हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक. लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे आबा कोंडस्कर यांची एक्झिट कित्येकांच्या जीवाला चटका लावून गेली.
सुनील म्हापणकर हे देखील शिवसेनेचे जि. प. सदस्य. जनता दलातून राजकीय कारकीर्द सुरू केलेले सुनील म्हापणकर नंतर शिवसेनेत दाखल झाले. पंचायत समिती सभापती म्हणून देखील त्यांनी काम केले. नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले परंतु त्यानंतर पुन्हा शिवसेनेत डेरेदाखल होत आपले कार्य अविरत सुरू ठेवले. दानशूर, निधड्या छातीचा,धडाडीचा कार्यकर्ता म्हणून सुनील यांची ओळख होती. दिवसारात्री कधीही लोकांच्या सेवेसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची लोकांमध्ये क्रेझ होती. अनेकांना आर्थिक मदत त्यांनी केली त्यामुळे आपल्या मतदारसंघात ते सर्वसामान्यांचे लाडके नेते होते.
कोरोनाच्या महामारीत जिल्ह्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, परंतु राज्यात सत्तेत असणाऱ्या आणि जिल्ह्यात आपल्या नेतृत्वाने छाप पडलेल्या लोकप्रतिनिधींचे अकाली जाणे चिंताजनक आहे. वेंगुर्ला तालुक्यातून आमदार दीपक केसरकर यांना पर्यायी शिवसेनेला म्हापण,परुळे, भोगवे परिसरातून जबर मताधिक्य देण्यात या द्वयीचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे दीपक केसरकर आणि शिवसेनेला आबा कोंडस्कर आणि सुनील म्हापणकर यांचा मृत्यू हा जबर धक्का मानला जातो. सरकारने लसीकरणासाठी केलेला उशीर हे देखील जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि मृत्युदर वाढण्याचे एक कारण असून त्यामुळेच लोकप्रतिनिधी सह जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आपल्या प्राणास मुकावे लागत आहे.