सात वर्षाच्या चिमुरडीला मेंदूचा कॅन्सर
प्रोटॉन थेरपीसाठी ३५ लाखाची गरज : दात्यांना आवाहन
सावंतवाडी
खरंतर तिचं हे वय खेळण्या-बागडण्याचं…इतर लहान मुलांप्रमाणेच तीसुद्धा खेळकर .. गोड .. मात्र, नियतीने तिच्या नशिबी वेगळाच संघर्ष लिहीला ..कॅन्सर सारख्या असाध्य आजाराशी तिला सध्या लढाव लागतय ..तिच्या या संघर्षातून तिला बाहेर काढण्यासाठी तिला हवाय मदतीचा हात …
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील आणि सध्या मुंबईस्थित कु. रिया निलेश सावंत हीची ही दर्दभरी कहाणी. या सात वर्षाच्या चिमुरडीला मेंदूचा मेडुलॉब्लास्टोमा कॅन्सर झाला आहे. सुमारे आठ लाख खर्च करून तिचे ऑपरेशनही झाले आहे. मात्र चेन्नई येथे होणाऱ्या पुढील इंटेनसिटी मोडूलेटेड प्रोटॉन थेरपीसाठी सुमारे ३५ लाख खर्च आहे.
कु. रियाचे वडील मुंबईत निलकमल कंपनीत कामाला आहे. त्यांच्या पगारातुन कुटुंबाचा खर्च भागतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. रियाच्या कॅन्सर ऑपरेशनच्या खर्चाच्या पाठोपाठ प्रोटॉन थेरपीचा खर्च ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रीयाच्या आतापर्यंतच्या उपचारासाठी त्यांनी आपल्याकडील होते नव्हते ते सर्व संपवले आहे. त्यामुळे समाजातील स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास तिच्यावर पुढील उपचार होणार आहे.
गेल्या मार्च महिन्यात रियाला अचानक डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागल्यानंतर उपचारादरम्यान तिला मेंदूचा मेडुलॉब्लास्टोमा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि तिच्या आई वडिलांना धक्काच बसला. रियाच्या कॅन्सरच्या शस्त्र क्रियेवरील खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तरीही स्वतः कडची सर्व मिळकत गोळा करून व मित्र परीवारच्या सहकार्याने आठ लाख खर्च करून एप्रिल महिन्यात मुलुंड येथील फोरटीज हॉस्पिटलमध्ये रियाचे कॅन्सरचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र पुढील इंटेनसिटी मोडूलेटेड प्रोटॉन थेरपीची सुविधा मुंबईत नसल्याने त्यासाठी तिला चेन्नई येथील अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर येथे न्यावे लागणार आहे. या प्रोटॉन थेरपीसाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च आहे. हाती पैसाच नसल्याने रिया इंटेनसिटी मोडूलेटेड प्रोटॉन थेरपीच्या प्रतीक्षेत होती.
त्यामुळे या थेरपी उपचारावरील खर्चासाठी पारपोली गावचे मुंबईस्थित सेवाभावी व्यक्तिमत्त्व गोपाळ गावकर यांच्यासह काही सेवाभावी व्यक्ती व सावंत यांच्या मित्र व नातेवाईक यांनी पुढाकार घेवून काही रक्कम गोळा केली आहे. मात्र रियावरील प्रोटॉन थेरपीसाठी लागणार खर्च पाहता ती कमीच आहे. तरीही या जमलेल्या रकमेतुन जे उपचार होतील त्यासाठी रियाला सोमवारी चेन्नई येथे नेण्यात येणार आहे. यापुढे आवश्यक रक्कम जमा झाल्यास रियावर पूर्ण प्रोटॉन थेरपी होणार आहे. त्यानंतरच रिया या आजारातून पूर्ण बरी होणार आहे. त्यामुळे समाजातील सर्व दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील बँक खात्यावर मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यासाठी खालील बँक खात्यावर मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निलेश रमेश सावंत
बँक आयसीआयसीआय खाते क्र 001101542436
आयएफएससी कोड ICIC0000011