सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक भारतीची प्रशासनाकडे मागणी
तळेरे
आरोग्य कर्मचारी तसेच पोलिस यंत्रणेला शासनाने फ्रंन्टलाईन कोरोना योध्दा म्हणून प्रथम प्राधान्याने लसीकरण केले आहे. मात्र माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांनाही फ्रंन्टलाईन वर्करच्या कोराना ड्युटी लाऊनही त्यांच्या आरोग्यबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेने केला असून जोपर्यंत शिक्षकांना लस दिली जात नाही तोपर्यंत कोवीडची ड्युटी लावू नये अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर व सचिव सुरेश चौकेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,राज्य प्रतिनिधी
चंद्रकांत चव्हाण,संघटक समीर परब,महिला आघाडी प्रमुख सुस्मिता चव्हाण यांनी दिली.
शिक्षक भारती संघटनेने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की,शिक्षकांचा वापर प्रत्येक कामासाठी सरकारकडून केला जातो मात्र, जेंव्हा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा त्यांच्याकडे अक्षम्यदुर्लक्ष केले जाते.
त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या शिक्षकांना वेळीच उपचार न मिळाल्याने राज्यभर २१५शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अख्खी कुटुंबच्या- कुटुंब उध्वस्त झाली असल्याच्या घटना ताज्या आहेत.
*…तर शिक्षकांनी सहकार्य का करावे?*
आमचे शिक्षक कोणतेही शासनाचे काम नाकरत नाहीत आणि नाकारणारही नाही. पण, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी जर शासनाकडून झटकली जात असेल तर शिक्षकांनी प्रशासनाला का सहकार्य करावे? असा सवालही शिक्षक भारती संघटनेने केला आहे.राष्ट्रीय आपत्ती च्या नावाखाली शिक्षकांची सध्या पिळवणूक सुरू आहे ती त्वरित थांबवावी असेही या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*बोटावर मोजता येतील इतक्याच शिक्षकांचा लसीकरण-*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनाही अशाचप्रकारे लसीकरणाशिवाय असुरक्षितरित्या कोवीड- १९ कामगिरीवर काढले असून यापैकी अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच शिक्षकांनी पहिला डोस घेतला आहे.
सध्या जिल्ह्यात लसीचा मोठा तुटवडा भासत असल्याने शिक्षकांना या लसीकरणमोहिमेत प्रथम प्राधान्याने लसीकरण करुनच मग त्यांना ड्युटी लावावी अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात संजय वेतुरेकर यांनी केली आहे.
*ड्युटीचा कालावधी कमी करावा-*
त्याचबरोबर या शिक्षकांना लावलेल्या १५ते१८दिवसाच्या सलग ड्युटी ऐवजी फक्त१०दिवसाची ड्युटी लावावी, तसेच या ड्युटीची नोंद त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात करण्यात यावी. कोराना आपत्ती व्यवस्थापन फ्रंन्टलाईन वर्करप्रमाणे शिक्षकांनाही विमा संरक्षण मिळावे. अशा अनेक मागण्या शिक्षक भारती संघटनेने प्रशासनाकडे केल्या आहेत.हे सर्व प्रश्न आमदार कपिल पाटील यांच्या मार्फत राज्य स्तरावर मांडला जाईल असे वेतुरेकर यांनी माहिती दिली.
फोटो:
शिक्षक भारती लोगो