कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली 10 वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळात गरीब, निराधार, बेघर, आदिवासी अशा ७५० हुन अधिक कुटुंबाना रेशन वाटप करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात यावर्षी ही संपूर्ण लोकडाऊन लागल्यामुळे बऱ्याच लोकांचे रोजगार गेले, रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोक आणि सामाजिक तथा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, आदिवासी कुटुंबियांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. बरीच कुटुंबे जी छोटी – मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करतात अशा कुटुंबियांना तर कोरोनाची कमी आणि उपासमारीची जास्त भीती वाटू लागली, लहान मुले अबालवृद्धांची होत असलेली उपासमार बघून कोकण संस्थेने आपल्या फूड फॉर होमलेस या मोहिमेच्या अंतर्गत मुंबई, पुणे येथील गरजू कुटुंबाना रेशन वाटप करण्याचे ठरवले. या उपक्रमांतर्गत लॉक डाउन २च्या काळात ३६० हुन अधिक कुटुंबियांना संस्थेने मदत केली असून दादर आणि वडाळा विभागात रस्त्यावर राहणाऱ्या बेघर कुटुंबियांना या उपक्रमांतर्गत मदत करण्यात आली.
कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करून प्रीती पांगे, सिंड्रेला जोसेफ, फातिमा दलाल, साक्षी पोटे, स्नेहल राणे, सलीना बुटेला, शीतल कांबळे, कविता राजपूत, श्वेता जाधव, वर्षा वैद्य, कविता बिंगी, ऋतुजा कांबळे, माधुरी ठाकूर, सचिन धोपट, अक्षय ओवळे, योगिता निजामकर आदी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दादर आणि वडाळा विभागात बेघर कुटुंबाना रेशन देऊन मदत केली. या मदतीबद्दल गरजू कुटुंबीयांनी संस्थेचे आभार मानले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कोकण संस्थेच्या माध्यमातून कोविड काळात गरजूंना मदत मिळावी यासाठी संस्था मास्क वाटप, फेसशिल्ड, सॅनिटायझर वाटप, अन्नदान, रेशन वाटप, कोविड वॅक्सीनेशन रजिस्ट्रेशन सेंटर, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर साठी मदत, रक्तदान शिबिर, औषध वाटप, कोविड उपचाराविषयक मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवत असल्याचे संस्थेचे व्यवस्थापक सुरज कदम यांनी सांगितले.