यामिनी
…..एके दिवशी सुरम्य संध्याकाळी, सर्वाथानेच मुग्ध गंधाळणाऱ्या अप्रतीम सुंदर अशा कार्यक्रमात निमंत्रीतांच्याच रांगेत मी बसलो होतो .माझ्याच पुढील रांगेत अगदी माझ्याच समोरील खुर्चीत एक विलक्षण स्वर्ग सुंदरी बसली होती. तिच्या त्या लावण्य सुंदर कमनीय पाठमोऱ्या पण अप्रतीम सौन्दर्याने तीला पाहण्याची तीव्र इच्छया मला झाली होती…खरं तर असं कधीच झालं नव्हतं !…तिच्या त्या सुकुमार गौरांगी सोज्वळ कांती वरुन तिच्या काळ्याभोर क़ुरळ्या केशसांभारातून पाठीवर रुळणारा बकुळ फूलांचा माळलेला गजरा त्या गंधाळलेल्या वातावरणाला अजुनच गंधाळून टाकत होता …!
बकुळगंध तसा दुर्मिळच ! तीला समोरून पाहण्याची माझी उत्सुकता ही मात्र शिगेला पोहोचली होती …एवढयात व्यासपीठावरुन ….कृपया ” कवयित्री *यामिनी काजळे*” यांनी व्यासपीठावर यावे अशी संयोजकांनी विनंती केली होती . आणी क्षणार्धातच त्याच माझ्याच समोर बसलेल्या विदुषीला तिच्याच बरोबर आलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीने सर्वार्थाने सावरुन तीला हाताला धरूनच व्यासपीठावर नेले . मी पहात राहिलो ! व्यासपीठावर लगेचच तिचा एक कवयित्री म्हणून यथायोग्य साजेसा सत्कारही करण्यात आला . ..मी सारे आश्चर्याने पहात होतो …
संयोजकांनी तीला दोन शब्द बोलावेत अशी विनंती केली …तिच्या हातामध्ये व्यवस्थित माईकही दिला …मी आता भानावर आलो होतो ..ती सुंदर विदुषी आपल्या अत्यंत लाघवी मंजूळ अशा आवाजात बोलत होती …..नमस्कार …! मी ” यामिनी काजळे ….आपणा सर्वांचीच ऋणी आहे ….आपल्या प्रेमाने मी अंतरातून भारावून गेले आहे …..!..माझ्या या दैवजात अशा अंध:काराच्या रंगमहालातून तुम्हा सर्व सहॄदांना न्याहळत आहे ..कितिकिती सुंदर आहे सारे हे जग ..! आणी तुम्हीही सर्वजण..! माझ्या या बंद अंधार पापण्यातून तुम्हा सर्वांच्याच निर्मळ, अतूट आणी असीम प्रेम बंधनातून माझ्या अंतरात्म्यात सातत्याने झूळझूळणाऱ्या साऱ्या संवेदना मला सर्वार्थानं तृप्त आनंदाने जगवित आहेत ..त्या संवेदनांची भावशब्द फुले होतात …त्या फुलांची अक्षरे होतात …..अक्षरांच्या ओळी होतात ..ओळीरचना कवीतांच्या स्वरुपात प्रसवतात …अन ते प्रसवणे एक ” *काव्यापत्य* असते ….आणी ते तुम्ही सारे अलवार स्वतःच्या ओंजळीत हॄदयाशी घट्ट कुरवाळून गंधता ..! हेच माझे भाग्य !… यामुळेच मी या माझ्या अंधाराच्या सुरम्य रंगमहालात खुप सुखानंदात जगते आहे ….!!!
धन्यवाद..! धन्यवाद ..!!!!!
त्या अतिसुंदर अशा अवर्णनिय अंधारलेल्या रंगमहालातील सुंदरतेची ” *वेदनां* देखील सुंदर भावपूर्ण तृप्तानंदी असते याची मला प्रकर्षाने जाणीव झाली …मी आत्ममुख झालो ….
“” *ठेविले अनंते तैसेची रहावे ।
चित्ती असु द्यावे समाधान ।।
याची प्रचिती या स्वर्गसुन्दरी यामिनीला पाहुन आली ….तिचे सारे शब्द अंतराला निःशब्द करून गेले ! …दुःख वेदनांही प्रांजळ पवित्र असते याची अनुभूती देवून गेले .!!!!
नमस्कार …🙏🙏🙏🙏
*©वि.ग.सातपुते*….
*विगसा*
❇❇❇❇❇