मालवण
जिल्ह्यात १० मे पासून लागू होणाऱ्या कडक टाळेबंदी नियमावलीत मासेमारी व्यवसायासाठी काही सुधारणा आणि त्यामध्ये सुस्पष्टता आणणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी व्यक्त केले आहे. नव्या नियमावलीनुसार मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याचीच चिन्हे जास्त आहे. नियमावली बनवताना जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाचा नीट विचार व्हायला हवा असेही त्यांनी सांगितले.
श्री. खोबरेकर म्हणाले, माशांची घरपोच सेवा देण्यासाठी सर्वप्रथम माशांची खरेदी तर करावी लागणार आहे. त्यासाठी मासे नौकेतून बंदरात उतरावे लागणार आहेत. यांत्रिक-बिगरयांत्रिक नौकांना सापडलेले मासे विक्री करण्यासाठी मच्छीमारांना बंदराच्या ठिकाणी जावे लागणार आहे. याचा विचार प्रशासनाने करणे आवश्यक आहे. नौकांना मिळालेले मासे मच्छीमार स्वतः थेट घरपोच वितरीत करू शकत नाहीत. त्यांना त्यांचे मासे नेहमीप्रमाणे बंदराच्या ठिकाणीच खरेदीदारांना एजंटमार्फत विकावे लागणार आहेत. तरी प्रशासनाने या गोष्टीचा विचार करून गतवर्षीप्रमाणे सुरक्षित अंतराचा नियम पाळत नियोजनबद्धरित्या बंदराच्या ठिकाणी आखणी करून द्यायला हवी. अन्यथा ८ मे रोजी जारी झालेली नियमावली जशीच्या तशी लागू केल्यास मच्छीमारांचा व्यवसाय ठप्प पडेल. मच्छीमारांकडे आता फक्त २० दिवसांचा कालावधी आहे. १ जून पासून संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर मासेमारी बंदी लागू होणार आहे. या २० दिवसांमध्ये पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी मच्छीमार धडपडत असतो. मात्र नवी नियमावली अंमलात आली तर बंदराच्या ठिकाणी मासे विक्री आणि मोठ्या वाहनांमाधून मासळीची वाहतूक करताच येणार नाही. त्यामुळे मासेमारी व्यवसायासाठी नियमावलीत काही सुधारणा करणे क्रमप्राप्त असल्याचे श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.