ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणार्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मृत्यु झाला आहे. डॉ. भालचंद्र काकडे असे या संशोधकाचे नाव आहे. डॉ. काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक उर्जा निर्माण करुन त्याद्वारे रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन डॉ. काकडे यांनी सुरु केले. इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ पेटंटही मिळवले होते. पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले. २० वर्षे त्यांनी संशोधन केले.
डॉ. काकडे हे सध्या चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिटयुटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पत्नीही तेथेच संशोधन करत आहेत़ तेथे लॅबमध्ये काही जण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांचीही टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 2 दिवसातच त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांना शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यार्थी धडपडत करत राहिले. परंतु, रुग्णातील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यु झाला आहे.