You are currently viewing कोरोनाचा कुटुंबावर घाला …..

कोरोनाचा कुटुंबावर घाला …..

मुलाच्या मृत्यू पाठोपाठ वडिलांचाही मृत्यू

मालवण
कोरोनाचा दुसरा टप्पा सिंधुदुर्ग जिल्ह्याला घातक ठरत आहे. कोरोनामुळे कुटुंबेच्या कुटुंबे उध्वस्त होत असून मालवण शहरातील भरड- वायरी येथील अशाच एका कुटुंबावर कोरोनाने घाला घातलाय.या कुटुंबातील एका ३४ वर्षीय मुलाचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. हा धक्क्याने कुटुंब हादरले असताना शुक्रवारी या मुलाच्या वडिलांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा दुसरा मुलगा शहरातील खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याने हाहाकार उडवला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण मिळुन येत असून कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या देखील मोठी आहे. मालवण शहर आणि तालुक्यात देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून येत असून शहरात देखील कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. शहरातील भरड वायरी येथील ३४ वर्षीय युवकाचे सोमवारी कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. कुटुंबातील कर्ता मुलगा कोरोनाने मयत झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या सुमारे ८० वर्षीय वडिलांना हा धक्का सहन झाला नाही. मुलाच्या मृत्यूनंतर चार- पाच दिवस त्यांनी अन्नपाणी सोडलं. त्यातच त्यांची प्रकृती खालावली. त्यांची तब्बेत सुधारत नसल्याने शुक्रवारी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह येऊन राहत्या घरातच दुपारी १२.३० वाजता त्यांनी प्राण सोडला. कोरोनाचे नियम पाळून पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर येथील बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या कुटुंबाला बसलेल्या दुहेरी धक्क्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलावर शहरातील खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा