सावंतवाडी
गव्या रेड्यांकडून अनेक ठिकाणी नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु सावंतवाडी तालुक्यातील दांडेली वरचावाडा येथे एका शेतकऱ्याच्या बागेत भर दिवसा फणसावर यथेच्छ ताव मारताना गवा रेडा दिसला. रस्त्याच्या बाजूलाच गवा रेडा असल्याने ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु दहा ते पंधरा मिनिटे गवा फणसावर तावच मारत होता.
दांडेली वरचावाडा येथे फणस, काजू, कोकम आदी बागायती आहेत. वरचावाडा येथील सूर्या नाईक हे आपली शेतीची कामे करून घरी परतत असताना अचानक त्यांना गवा महाकाय रेडा दिसला. त्यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलावले व रस्त्याच्या बाजूलाच फणसावर ताव मारत असलेल्या गव्या रेड्याला घालवण्याचा प्रयत्न केला. दहा ते पंधरा मिनिटे गवा रेडा न हलता ताव मारत होता. काही वेळाने गव्याने शेतकऱ्यांना हूल दाखवली व जंगलाच्या दिशेने पलायन केले.
दरम्यान, ऐन काजूच्या हंगामात दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या बागेत गव्यांचा सुरू असलेला उपद्रव वनविभागाने थांबवावा. दांडेली गावातील कोणत्याही शेतकऱ्यास वन्य प्राण्यांपासून हानी किंवा नुकसानी झाल्यास वनविभाग जबाबदार राहणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नालासोपारा विभाग उपाध्यक्ष अमित नाईक यांनी सांगितले.